Advertisement

महापौर सभागृहात चर्चाच करू देत नाहीत - भाजपा


महापौर सभागृहात चर्चाच करू देत नाहीत - भाजपा
SHARES

मुंबई महापालिकेत सत्तेबाहेर बसून पहारेकऱ्यांची भूमिका बजावणाऱ्या भाजपाचे नेते आणि नगरसेवक डुलक्या काढू लागले आहेत. गटनेत्यांच्या सभेत राणीबागेच्या शुल्कवाढीचा प्रस्ताव मंजूर करून घेतल्यानंतर सभागृहात नगरसेवकांना महाराष्ट्रात टोलमाफी देण्याचाही ठराव सत्ताधारी शिवसेनेने केला. परंतु यावरून पहारेकऱ्यांना चांगलीच पडली असून, त्यांनी मात्र याचे खापर महापौरांवर फोडले आहे. ठरावाच्या सूचनेवर आमच्या सदस्यांनी दोन वेळा चर्चेची मागणी केल्यानंतरही महापौरांनी चर्चा करू न देता ठरावाच्या सूचना अनुकूल, प्रतिकूल करत मंजूर केल्या. त्यामुळे सभागृहात संसदीय कामकाज करण्यास महापौर कमी पडत असून, त्यांच्यामुळेच हा घोळ झाल्याचे सांगत त्यांनी विश्वनाथ महाडेश्वर यांच्याकडे बोट दाखवले आहे.

मुंबई महापालिकेच्या नगरसेवकांना राज्यातील सर्व टोलनाक्यांवर सवलत देण्याचा शिवसेना नगरसेवक तुकाराम पाटील यांच्या मागणीचा ठराव महापालिका सभागृहात 8 मे रोजी मंजूर करून पुढील अभिप्रायासाठी आयुक्तांकडे पाठवण्यात आला आहे. शिवसेनेच्या या मागणीनंतर संपूर्ण मुंबईत विरोधाचे रान उठले असून, प्रसारमाध्यमांमधून याचा तीव्र विरोधही केला जात आहे. भाजपाचे मुंबई अध्यक्ष अॅड. आशिष शेलार यांनी याचा विरोध करून आमच्या नगरसेवकांना अशा प्रकारची टोलमाफीची गरज नसल्याचे जाहीर केले. याबाबत भाजपाचे गटनेते मनोज कोटक यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी ठरावाच्या सूचनांवर महापौर चर्चा करू देत नसल्याचे सांगत आमच्या दोन सदस्यांनी दोन वेळा चर्चेची मागणी करूनही परवानगी दिली नसल्याचा आरोप महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांच्यावर केला आहे. 'राज्यात बहुतांशी सर्वच टोल माफ करण्यात आले आहेत. त्यामुळे नक्की कुठल्या टोलवर माफी हवी हे शिवसेनेने सांगावे. वरळी सागरी मार्गावर टोलमाफी आहेच. पण आमच्या कुठल्याही नगरसेवकांना असल्या सुविधा नकोत. म्हणून आम्ही बेस्टचे पासही घेतले नाहीत', असे मनोज कोटक यांनी स्पष्ट केले. मुळात ही सूचना अभिप्रायसाठी पाठवण्यात आली आहे. अभिप्राय आल्यानंतर चर्चा करू असे महापौरांकडून सांगितले जाते. पण चर्चा करू दिली जात नाही. त्यामुळे या घोळाला महापौरच जबाबदार असून, यापुढे नगरसेवकांना चर्चा करायची असल्यास त्या सूचनेवर चर्चा करूनच ठराव मंजूर केला जाईल, असे कोटक यांनी सांगितले आहे.

भाजपाचे दाखवायचे दात वेगळे
महापौर चर्चा करायला देत नाहीत, असे जर भाजपाचे म्हणणे असेल तर ते धादांत खोटे बोलत आहेत. त्यांचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे वेगळे आहेत. भाजपाच्या नगरसेविका ज्योती अळवणी व दक्षा पटेल यांना महापौरांनी चर्चा करायला दिली. पण अन्य कुठल्याही सदस्याला चर्चा करायला दिली नाही, असा दावा सभागृहनेते यशवंत जाधव यांनी केला आहे.

टोलमाफीचा ठराव शिवसेनेला अमान्य
टोलमाफीचा जो ठराव मंजूर झाला आहे, त्याच्याशी शिवसेना सहमत नाही. आमदार आणि खासदारांना टोलमाफी देणे योग्य आहे. परंतु मुंबईच्या नगरसेवकांना टोलमाफी दिल्यास सर्वच महापालिकांच्या नगरसेवकांना ही टोलमाफी द्यावी लागेल आणि तशी वांद्रे- वरळी सागरी सेतूसह दहिसर आणि मुंबईच्या प्रवेशद्वारावर मुंबईच्या नगरसेवकांना टोलमाफी मिळते. मात्र, यापुढे शिवसेनेच्या सर्व नगरसेवकांच्या ठरावाच्या सूचना या आपल्या मान्यतेनंतरच महापालिका चिटणीस विभागाकडे वर्ग केल्या जाणार असल्याचे यशवंत जाधव यांनी स्पष्ट केले.

महापालिकेतील शिवसेना नेते करतात काय?
शिवसेना नगरसेवक तुकाराम पाटील यांच्या सूचनेमुळे पक्षाला मानहानी आणि टिकेचे धनी व्हावे लागत आहे. त्यामुळे ही ठरावाची सूचना पटलावर घेण्यापूर्वी महापौरांनी ती बाद का केली नाही? तसेच पटलावर घेण्यात आल्यानंतर सभागृहनेते यशवंत जाधव यांनी तुकाराम पाटील यांना गैरहजर ठेवून ही सूचना बाद का ठरवली नाही?असे प्रश्न निर्माण झाले आहेत. दरम्यान, विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी नगरसेवक हे जनतेचे सेवक असून, जर टोलमाफी दिली जाणार असेल तर सर्वांनाच दिली जावी, अशी भूमिका मांडत आपला याला विरोध असल्याचे जाहीर केले.


हेही वाचा - 

मुंबईच्या नगरसेवकांना स्वत:साठी हवी राज्यभरात टोलमाफी



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा