Advertisement

मिलिंद एकबोटे राज ठाकरेंच्या भेटीला

राज ठाकरे आणि एकबोटे यांच्या भेटीमुळे राजकीय वर्तुळाच्या भुवया उंचावल्या

मिलिंद एकबोटे राज ठाकरेंच्या भेटीला
SHARES

कोरेगाव-भीमा प्रकरणातील आरोपी आणि हिंदू एकता आघाडीचे नेते मिलिंद एकबोटे यांनी रविवारी मनसेप्रमुख राज ठाकरे यांची भेट घेतली. येत्या २४ तारखेला संभाजी महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त वढू बुद्रूक याठिकाणी होणार्‍या कार्यक्रमाचे निमंत्रण देण्यासाठी ते कृष्णकुंज येथे आले होते. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये काहीवेळ चर्चा झाली. राज ठाकरे आणि एकबोटे यांच्या भेटीमुळे राजकीय वर्तुळाच्या भुवया उंचावल्या आहेत.

हेही वाचाः- मेट्रोनंतर रेल्वे-एसटी करोनासाठी सज्ज

राज ठाकरे यांच्या भेटीनंतर मिलिंद एकबोटे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी एकबोटे यांनी म्हटले की, राज ठाकरे यांनी हिंदुत्ववादी भूमिका घेणे स्वागतार्ह आहे. त्यांनी हिंदूंवर होणार्‍या अन्यायाला वाचा फोडलीच पाहिजे, असे एकबोटे यांनी म्हटले.भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणानंतर हिंदुत्ववादी कार्यकर्ते मिलिंद एकबोटे आणि संभाजी भिडे यांच्यावर पुण्यात एट्रॉसिटी आणि दंगल भडकावणे या कलमांखाली गुन्हे दाखल झाले आहेत. सध्या पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरु आहे.

हेही वाचाः- 'इतक्या' महिला चालक एसटी सेवेत होणार दाखल

यंदा १ जानेवारीला विजय दिनाच्या दिवशी संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटे यांच्यासह १६३ जणांना पुणे जिल्ह्यात प्रवेशबंदी करण्यात आली होती. दरम्यान, राज ठाकरे आणि मिलिंद एकबोटे यांच्या भेटीविषयी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी भाष्य केले. त्यांनी म्हटले की, राज ठाकरे हे राजकारणी असल्याने त्यांना कोणालाही भेटण्याचा हक्क आहे. मात्र, आपण काय भूमिका घेत आहोत, हे कळण्याइतकी समज त्यांच्याकडे आहे. त्यांनी प्रबोधनकारांची शिकवण लक्षात ठेवावी, असे भुजबळ म्हणाले. दरम्यान आज मनसेचा १४ वा वर्धापन दिन असून पहिल्यांदाच मनसे मुंबईबाहेर नवी मुंबईत वर्धापन दिन साजरा करणार आहे. नवी मुंबई महानगर पालिका निवडणूकीच्या पार्श्वभूमिवर हा वर्धापन दिन नवी मुंबईत घेण्याचे राज ठाकरे यांनी घेतला असल्याचे बोलले जाते. 


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा