Advertisement

नाणार प्रकल्पाबाबतच्या भूमिकेला शरद पवार यांचाही पाठिंबा, राज ठाकरेंचा दावा

कोकणातील नाणार रिफायनरी प्रकल्पाबाबत मी जी भूमिका मांडली आहे. त्या भूमिकेला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा पाठिंबा आहे, असा दावा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला.

नाणार प्रकल्पाबाबतच्या भूमिकेला शरद पवार यांचाही पाठिंबा, राज ठाकरेंचा दावा
SHARES

कोकणातील नाणार रिफायनरी प्रकल्पाबाबत मी जी भूमिका मांडली आहे. त्या भूमिकेला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (sharad pawar) यांचा पाठिंबा आहे. आपण पाठवलेल्या पत्रानंतर शरद पवार यांनी स्वत: आपल्याला फोन करून भूमिका योग्य असल्याचं म्हटलं, असा दावा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला. 

नाणारवासियांनी सोमवारी मुंबईतील दादर येथील कृष्णकुंज निवासस्थानी राज ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीत नाणार रिफायनरी प्रकल्पाबाबत राज ठाकरे यांनी भाष्य केलं. शरद पवार या मुद्द्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची लवकरच भेट घेऊन चर्चा करणार आहेत. मुख्यमंत्र्यांनी मला, तुम्हाला भेटीसाठी वेळ दिली नाही तरी शरद पवारांना ते नक्कीच वेळ देतील, असा टोला देखील राज ठाकरे यांनी यावेळी लगावला.

कोकणात आपल्याला पर्यटनावर आधारित रोजगारनिर्मिती करायला हवी आणि भविष्यात त्यावरच लक्ष केंद्रित करू, पण नोटबंदी ते कोरोना या काळात प्रचंड बेरोजगारी वाढली. असंख्य कंपन्या बंद झाल्याने अनेकांचे रोजगार गेले. अशा विदारक स्थितीत ग्रीन रिफायनरीसारखे प्रकल्प राज्याबाहेर जाऊ नयेत, अशीच आपली इच्छा आहे. नाणारच्या प्रकल्पात आपल्या महाराष्ट्रातल्या (maharashtra) मुला-मुलींना नोकऱ्यांमध्ये प्राधान्य मिळायला हवं नाहीतर आम्ही आहोतच, असा सूचक इशारा देखील राज ठाकरे यांनी नाणारवासियांच्या शिष्टमंडळाला दिल्या.

रत्नागिरी जिल्ह्यातील प्रस्तावित ग्रीन रिफायनरी प्रकल्पाला स्थानिकांकडून विरोध होत आहे. याच मुद्द्यावरून राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवून कुठल्याही परिस्थितीत हा प्रकल्प राज्याबाहेर जाऊ नये, यासाठी प्रयत्न करण्याची विनंती केली आहे.

हेही वाचा- कोरोनाला रोखण्यासाठी मुंबई महापालिकेनं केला 'इतका' खर्च

राज ठाकरे (raj thackeray) यांनी आपल्या पत्रात म्हटलं आहे की, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खरं तर सगळेच संदर्भ बदलले आहेत. आपल्या राज्यात, देशात गुंतवणूक यावी यासाठी जीवघेणी स्पर्धा सुरु आहे. मध्यंतरी एक मोठा आंतरराष्ट्रीय प्रकल्प बंगळुरूत गेला आणि तो महाराष्ट्रात परत यावा यासाठी महाराष्ट्र सरकारची धडपड सुरु आहे हे मी वाचलं. ही बातमी क्लेशदायक होती. आसपासची राज्यं महाराष्ट्राच्या घशात हात घालून उद्योग पळवून न्यायला टपलेली आहेत. अशा वेळेस महाराष्ट्राने ‘रत्नागिरी राजापूर रिफायनरी’सारखा सुमारे तीन लाख कोटी रुपयांचा प्रकल्प हातातून गमावू नये. हे महाराष्ट्राला आज परवडणारं नाही. 

या प्रकल्पाला काही स्थानिक भूमिपुत्रांचा विरोध होता. त्यांचं म्हणणं रास्त होतं. इथल्या जमिनी परप्रांतियांच्या घशात जाऊ शकतात ही त्यांची भीती होती जी काही प्रमाणात तेव्हा रास्तही ठरली. उद्या नवीन प्रकल्पामुळे निर्माण होणारा रोजगार आणि इतर उद्योग यात कोकणी माणसाला स्थान कुठे असेल ही त्यांची शंका होती. काही पर्यावरणवाद्यांच्या मनातील ही भावना होती की कोकणाचा निसर्ग नष्ट होईल. त्यामुळेदेखील काही भूमिपुत्र चिंतेत होते. तिथे असलेल्या काही मंदिरांचाही प्रश्न होता. या मंदिरांचं काय होणार हा विचार त्यांच्या मनाला नख लावत होता. हे प्रश्न, चिंता, शंका रास्त होत्या आणि आहेत. पण आज यावर मार्ग काढणं आवश्यक आहे. 

करोनानंतर (coronavirus) ( लॉकडाऊननंतर) परिस्थिती बदलली आहे. लाखो तरुण बेरोजगार झाले आहेत. शासन आर्थिक चणचणीचा सामना करत आहे. अशा प्रसंगी राज्य ठामपणे उभं राहाण्यासाठी आपण वेगळ्या दृष्टिकोनातून उद्योगांकडे आणि प्रकल्पांकडे पाहायला हवं. या नवीन प्रकल्पामुळे जो रोजगार निर्माण होईल त्यात कोकणी माणसाला आणि पर्यायाने महाराष्ट्रातील मराठी माणसांनाच प्राधान्य असायला हवं असा करार सरकारने गुंतवणूकदार कंपनीसोबत करायला हवा. तसंच या प्रकल्पामुळे जे उद्योग निर्माण होतील त्यात देखील कोकणी तरुणांना जास्तीत जास्त संधी मिळायला हवी. 

आपण या माझ्या म्हणण्याचा योग्य तो विचार कराल आणि राज्याच्या दीर्घकालीन हिताचा निर्णय घ्याल अशी मी आशा करतो. सद्यपरिस्थितीत महाराष्ट्र राज्य प्रगतीपथावर नेण्यासाठी असे निर्णय घेणं ही काळाची गरज आहे. कोणी काहीही म्हणू दे .. महाराष्ट्र फर्स्ट .. असं धडाकेबाज धोरण असायला हवं.

(mns chief raj thackeray backs nanar refinery project in konkan)

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा