Advertisement

मुंबईचे महापौर राणीबागेतील पिंजऱ्यात, राज यांचे फटकारे

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी महापौर निवास राणीच्या बागेत हलवण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर राज यांनी व्यंगचित्रातून महापौर आणि शिवसेनेला लक्ष्य केलं आहे.

मुंबईचे महापौर राणीबागेतील पिंजऱ्यात, राज यांचे फटकारे
SHARES

दिवाळीत सर्वत्र फटाके फुटत असतानाच दुसरीकडे मनसे अध्यक्ष आणि व्यंगचित्रकार राज ठाकरे यांच्या कुंचल्यातून रोजच्या रोज दिवाळीत व्यंगचित्रात्मक फटाके फुटत आहेत. अगदी पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह, मुख्यमंत्री, उद्धव ठाकरे, भाजपापर्यंत कुणीही राज ठाकरेंच्या आतिषबाजीतून वाचलेले नाही. अशातच राज यांनी मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांच्यावर व्यंगचित्र रेखाटत टीकात्मक फटाक्यांचा धूर काढला आहे.


काय दाखवलंय व्यंगचित्रात?

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी महापौर निवास राणीच्या बागेत हलवण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर राज यांनी व्यंगचित्रातून महापौर आणि शिवसेनेला लक्ष्य केलं आहे. राज यांनी राणी बागेतील एका पिंजऱ्यात चक्क महापौरांना कोंडलं आहे. एका बाजूला मुंबईच्या महापौरांचं मूळ निवासस्थान सोडून त्यांना जिजामाता उद्यान (मुंबईचे प्राणीसंग्रहालय) इथं घर देण्यात आलं-बातमी अशा मथळा आहे.

तर दुसऱ्या बाजूला बाळा, त्यांना खायला घालू नकोस, अरे, ते आपल्या मुंबई महापौर आहेत, असा मथळा आहे. या दोन्ही मथळ्याच्या वर पिंजऱ्यांत प्राण्यांबरोबर महापौर डांबलेले दिसताहेत. बोचऱ्या शब्दांत महापौर आणि शिवसेनेवर केलेली ही टीका शिवसेना आणि महापौरांना झोंबणारी अशीच असल्याची चर्चा आता यावरून रंगली आहे.


हट्ट सोडला

बाळासाहेबांच्या स्मारकासाठी शिवसेनेनं दादर येथील महापौरांच्या निवासस्थानाची निवड केली आहे. सुरूवातीला महापौरांनीही राणीच्या बागेत जाण्यास नकार देत मलबार हिल येथील बंगल्याचा हट्ट धरला होता. पण आता महापौरांनी हट्ट सोडला असून ते राणीच्या बागेत जाण्यासही तयार झाले आहेत. इतकंच नव्हे तर त्यांनी अधिकृतरित्या महापौर बंगल्याचा ताबा सोडून बाळासाहेब ठाकरे स्मारक ट्रस्टला ही जागा हस्तांतरीत केली आहे. त्यामुळे आता लवकरच महापौर राणीच्या बागेत स्थलांतरीत होणार असल्याचं म्हटलं जात आहे.



हेही वाचा-

भारतमाता पुन्हा ओवाळणार नाही... राज ठाकरेंची आतिषबाजी

सोशल मीडियातील प्रचारयुद्धाला मनसे पदाधिकारी 'सज्ज'



Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा