Advertisement

शिवाजी पार्क म्युनिसिपल जिमखान्याची एक इंचही जागा देणार नाही- राज ठाकरे

एका बाजूला मुंबईतील मोकळ्या जमिनी बिल्डरांच्या घशात जात असताना, बाळासाहेबांच्या स्मारकाला मुंबईत भूखंड मिळू नये यासारखी दुर्देवी गोष्ट नसल्याचीही प्रतिक्रियाही त्यांनी दिली. कुठल्याही परिस्थितीत शिवाजी जिमखान्याची जागा महापौर बंगल्यासाठी देणार नसल्याचं म्हणत राज यांनी मुंबई महापालिका आणि शिवसेनेला आव्हान दिलं आहे.

शिवाजी पार्क म्युनिसिपल जिमखान्याची एक इंचही जागा देणार नाही- राज ठाकरे
SHARES

शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाच्या जागेवरून महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेनेत सामना रंगण्याची शक्यता आहे. स्मारकासाठी सरकारी जागा देण्यात येऊ नये, या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा भंग करत महापौर बंगल्यात स्मारक बांधण्याचा घाट घातला जात असल्याचा आरोप मनसे अध्यक्ष राज ठाकरे केला आहे. एवढंच नव्हे, तर एका बाजूला मुंबईतील मोकळ्या जमिनी बिल्डरांच्या घशात जात असताना, बाळासाहेबांच्या स्मारकाला मुंबईत भूखंड मिळू नये यासारखी दुर्देवी गोष्ट नसल्याचीही प्रतिक्रियाही त्यांनी दिली. कुठल्याही परिस्थितीत शिवाजी पार्क म्युनिसिपल जिमखान्याची जागा महापौर बंगल्यासाठी देणार नसल्याचं म्हणत राज यांनी मुंबई महापालिका आणि शिवसेनेला आव्हान दिलं आहे.


आयुक्तांची भेट

बाळासाहेब ठाकरेंचं स्मारक दादर येथील महापौर बंगल्यात केलं जाणार असून महापौर बंगला तात्पुरत्या स्वरूपात राणीबागेत हलवण्यात येणार आहे. कारण शिवाजी पार्क म्युनिसिपल जिमखान्याजवळ नवा महापौर बंगला उभारण्याचा महापालिकेचा प्रस्ताव आहे. मनसेचा मात्र याला विरोध असून त्यासाठीच राज ठाकरे यांनी गुरूवारी दुपारी महापालिका आयुक्त अजोय मेहता यांची महापालिका मुख्यालयात जाऊन भेट घेतली. या भेटीत राज ठाकरे यांनी महापौर बंगल्यात बाळासाहेब ठाकरेंचं स्मारक बांधण्यास विरोध दर्शवला. सोबतच त्यांनी फेरीवाल्यांचा मुद्दाही उचलून धरला.


या भेटीनंतर पत्रकारांशी बोलताना राज ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी मुंबईत जागा मिळू नये ही अत्यंत दुर्देवी गोष्ट असल्याचं सांगितलं. महापौर बंगल्यात स्मारक बनवणं हा सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा भंग असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.


एक इंचही जागा देणार नाही

जगातील महत्त्वाच्या शहरांमध्ये मुंबईचा समावेश हाेतो. असं असताना मुंबईच्या महापौरांना राहण्यासाठी मुंबईत जागा नाही. महापौरांना राणी बागेत हलवलं जातंय, इकडे-तिकडे फिरवलं जातंय. महापौरपद ही काही चेष्टा आहे का? असं प्रश्न विचारत राज यांनी महापौरांना इतरत्र हलवण्याच्या मुद्यावर महापालिका आणि शिवसेनेला चांगलंच धारेवर धरलं. शिवाजी मैदानात खेळांना अडसर ठरणाऱ्या महापौर बंगल्यासाठी शिवाजी पार्क म्युनिसिपल जिमखान्याजवळची एक इंचही जागा देणार नाही, असं ठामपणे सांगत राज यांनी महापालिका आणि शिवसेनेला आव्हान दिलं आहे.


फेरीवाल्यांवरील कारवाई थंड

फेरीवाल्यांविरोधात गेल्या वर्षी मनसेनं जोरदार आंदोलन केलं होतं. या आंदोलनानंतर न्यायालयाच्या निर्देशानुसार रेल्वे स्थानकाच्या १५० मीटरच्या परिसरात फेरीवाल्यांना बसण्यास कायमची बंदी घालण्यात आली. पण आता महापालिका अधिकाऱ्यांकडून १५० मीटरच्या आत बसणाऱ्या फेरीवाल्यांवर कुठलीही कारवाई होत नसल्याचं म्हणत राज ठाकरे यांनी नाराजी व्यक्त केली. फेरीवाल्यांना महापालिकेच्या लाचखाऊ-निक्कम्या अधिकाऱ्यांचं अभय असल्याचा आरोपही करताना नियम मोडणाऱ्या फेरीवाल्यांवर कडक कारवाई करण्याची मागणीही त्यांनी केली.


हेही वाचा-

बाळासाहेबांचं स्मारक होणार भूमिगत


Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा