Advertisement

नाहीतर, न्यायालयाच्या अवमानाची केस टाकू: राज ठाकरे


नाहीतर, न्यायालयाच्या अवमानाची केस टाकू: राज ठाकरे
SHARES

रेल्वे स्थानक आणि पालिका मंडईच्या १५० मीटरच्या परिसरात तर शाळा, काॅलेज, धार्मिक स्थळे आणि हाॅस्पिटलच्या १०० मीटरपर्यंच्या परिसरात फेरीवाल्यांना बसण्यास उच्च न्यायालयाने मनाई आहे. उच्च न्यायालयाच्या या आदेशाची प्रत आणि माझं एक पत्र घेऊन मनसैनिक प्रत्येक पोलीस ठाणे, वाॅर्ड आॅफिसर आणि रेल्वे स्टेशन मास्तरच्या हातात देऊन त्यांना कारवाई करण्याचं आवाहन करतील. त्यानंतरही या परिसरात फेरीवाले दिसल्यास संबंधित विभागातील अधिकाऱ्यांविरोधात उच्च न्यायालयाचा अवमान केल्याच्या केसेस दाखल करणार. मग मारा न्यायालयाच्या फेऱ्या, अशा कडक शब्दांत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी यंत्रणांनाच आव्हान दिलं आहे.


अखेर मौन सोडलं

एल्फिन्स्टन चेंगराचेंगरीनंतर फेरीवाल्यांविरोधातील आंदोलन मनसेने तीव्र केले आहे. तर यावरून चांगलेच राजकारण तापले आहे. डोकेफोडी, तोडाफोडी आणि राडा झाल्यानंतरही यावर समोर येत आतापर्यंत काहीही न बोलणाऱ्या राज ठाकरे यांनी शनिवारी वांद्रयात जाहीर सभा घेत अखेर मौन सोडलं. या सभेत राज ठाकरे यांनी फेरीवाल्यांना धारेवर धरलेच; पण त्याचवेळी संजय निरूपम यांच्यासह फेरीवाल्यांची बाजू घेत आपले मत मांडणाऱ्या नाना पाटेकर यांनाही टार्गेट केलं.




कितीही केस टाका, मराठी माणसासाठी झेलू

सरकार ढिम्म असेल तर आम्हाला हात उचलावाच लागेल, असं म्हणतानाच राज ठाकरे यांनी मनसैनिकांवर कितीही केस टाकल्या तरी हरकत नाही. मराठी माणसासाठी, मराठी माणसाच्या हितासाठी कितीही केस अंगावर घेऊ असं जाहीर करत त्यांनी मनसैनिकांचे, त्यांनी केलेल्या आंदोलनाचं कौतुक केलं.


नानाने चोंबडेपणा करू नये 

नाना पाटेकर एक चांगला अभिनेता आहे, त्यांने सिनेमा करावा, त्याचा सिनेमा आम्ही पाहू. पण कळतं नसेल त्या गोष्टीत चोंबडेपणा करू नये, असा टोला राज ठाकरे यांनी नाना पाटेकर यांना लगावला. नाना पाटेकर यांनी नुकतीच फेरीवाल्यांची बाजू घेतल्याने राज ठाकरे यांनी नाना पाटेकरांवर जोरदार टीका केली आहे. नानांची मिमिक्री करतानाच मराठी सिनेमांना थिएटर मिळत नव्हतं, तेव्हा नाना कुठे होता? असा सवालही केला.


काय म्हणाले राज ठाकरे?

  • मराठी माणसाच्या हितासाठी कितीही केसेस आल्या तरी झेलू
  • सत्तेत आल्यास केस काढून टाकू
  • पोलिसांनी आमचे संरक्षण करायला हवं तिथे आमची पोरं पोलिसांचं संरक्षण करताहेत
  • नाना पाटेकरांना ज्या गोष्टीतलं कळत नाही त्यात त्यांनी चोंबडेपणा करू नये
  • नाना पाटेकर चंद्रावरून खाली पडल्यासारखं बोलतो
  • फेरीवाला रोज १०० रुपये हप्ता भरतो, तसा नोकरी करणार भरू शकत नाही
  • आम्ही सगळ्यांना सांगितलं, त्यानंतरही प्रशासन ढिम्म असेल तर आमचा हात उठणारच
  • उच्च न्यायालयाच्या आदेशाचं पालन व्हावं
  • आज हात जोडून बोलतोय मला सोडायला लावू नका
  • अनधिकृत फेरीवाल्यांकडून भाजी विकत घेणे बंद करा
  • आपल्याला पाकिस्तानशी युद्ध करायची गरज नाही आपल्याच देशात युद्ध होईल
  • अधिकारी, पोलीस स्टेशन आणि मंत्रालयातील अधिकाऱ्यांना समजत नाही की हे आपण विष पोसतोय
  • सरकार नपुंसक असेल तर आम्ही आमच्या जनतेचे संरक्षण करु
Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा