लेटलतिफ महापौरांना घड्याळ भेट

  BMC
  लेटलतिफ महापौरांना घड्याळ भेट
  मुंबई  -  

  शिक्षकीपेशा असलेले प्राध्यापक विश्वनाथ महाडेश्वर हे महापौरपदी विराजमान झाले तरीही त्यांना महापालिकेची सभा वेळेवर सुरू करता आलेली नाही. यापूर्वीच्या महापौरांनी घालून दिलेल्या प्रथेप्रमाणेच विद्यमान महापौर महाडेश्वर यांनीही एक ते दिड तास उशिरानेच सभागृह चालवण्याचा सपाटा सुरू ठेवला आहे. त्यामुळे सलग चार ते पाच सभा वेळेत सुरू न केल्यामुळे अखेर मनसेचे गटनेते दिलीप लांडे यांनी महापौरांना भिंतीवरील घड्याळ भेट देत किमान यापुढे तरी दिलेल्या वेळेत सभा चालू करा, अशी विनंती केली.

  मुंबईच्या महापौरपदी विश्वनाथ महाडेश्वर यांची निवड झाल्यानंतर यापुढे महापालिकेच्या सर्वसाधारण सभा वेळेत सरू होतील,अशी आशा व्यक्त केली जात होती. परंतु या नव्या महापौरांनीही जुन्या महापौरांची प्रथा पुढे चालू ठेवली आहे. 10 मार्च रोजी पहिली सभा झाली. तेव्हापासून एकमेव सभा 11 वाजता झाली. ही वेळ वगळता दुपारी अडीचची सभा बोलावली जाते. परंतु आजतागायत एकही सभा अडीच वाजता सुरू करण्यात आलेली नाही. प्रत्येक सभा साडेतीन ते चार वाजताच सुरू करण्यात येत असल्यामुळे सभागृहात नगरसेवकांना बसून राहावे लागत आहे. नव्या महापालिकेत सर्वच सदस्य दुपारी दोनपासूनच सभागृहात येवून बसत असतात. त्यामुळे अडीच वाजता गणसंख्या (कोरम) पूर्ण होऊनही महापौर सभागृहात हजेरी लावत नसल्यामुळे नगरसेवकांना बसून राहावे लागते.

  सभागृह चालू करण्यासाठी वारंवार होणारा हा विलंब होत असल्यामुळे नगरसेवकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. त्यातच सोमवारी दुपारी अडीचचे सभागृह सव्वा तीन वाजता सुरू झाल्यामुळे मनसेचे महापालिका गटनेते दिलीप लांडे यांनी महापौरांना घड्याळ भेट दिली. घड्याळाची भेट महापौरांनी हसतच स्वीकारत घड्याळ पाहून सभागृह चालविले जाईल,असे मिश्किलपणे सांगितले.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.