Advertisement

कोविड सुरक्षेचे प्रोटोकाॅल पाळा, नाहीतर…, मनसेचा मालिका निर्मात्यांना इशारा

कोविड सुरक्षा प्रोटोकाॅल पाळण्याकडे दुर्लक्ष होत असल्याची बाब पुन्हा एकदा समोर आली आहे. यावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने इशारा देत कोविड सुरक्षा नियमांचं काटेकोरपणे पालन करण्यास निर्मात्यांना बजावलं आहे.

कोविड सुरक्षेचे प्रोटोकाॅल पाळा, नाहीतर…, मनसेचा मालिका निर्मात्यांना इशारा
SHARES

मराठी सिनेसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री आशालता वाबगावकर यांचं कोरोनामुळे नुकतंच निधन झालं. एका मालिकेच्या चित्रीकरणादरम्यान त्यांना कोरोनाची लागण झाली होती. यामुळे चित्रीकरणावेळी कोविड सुरक्षा प्रोटोकाॅल पाळण्याकडे दुर्लक्ष होत असल्याची बाब पुन्हा एकदा समोर आली आहे. यावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने इशारा देत कोविड सुरक्षा नियमांचं काटेकोरपणे पालन करण्यास निर्मात्यांना बजावलं आहे. (mns leader amey khopkar warns film and serial producers in maharashtra to follow covid 19 safety protocol seriously)

यासंदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट कर्मचारी सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी एक पत्रक जारी केलं आहे. या पत्रकात त्यांनी म्हटलं आहे की, टीव्ही मालिकेचं चित्रीकरण सुरू असताना ज्येष्ठ अभिनेत्री आशालता वाबगावकर यांच्यासह २७ जणांना कोरोनाची लागण झाली. तरीही मालिकेचं चित्रीकरण सुरूच राहिलं. त्याचाच परिणाम म्हणून ८३ वर्षीय आशालता यांचं निधन झालं.

हेही वाचा - ज्येष्ठ अभिनेत्री आशालता वाबगावकर यांचं निधन

राज्यातील लाॅकडाऊनमुळे गेले अनेक महिने मालिका तसंच सिनेमाचं चित्रीकरण पूर्णपणे बंद होतं. मनोरंजनसृष्टीतील अनेक नामवंतांनी चित्रीकरणास सशर्त परवानगी मिळावी, अशी मागणी वारंवार केल्यामुळे अखेर राज्य सरकारने कोविड प्रोटोकाॅलचं पालन करून शुटिंग करण्याची अट निर्मात्यांना घातली होती. दुर्दैवाने, मराठी तसंच हिंदीतील विविध मनोरंजन वाहिन्यांचे संचालक आणि मालिकांचे निर्माते कोविड प्रोटोकाॅलला पुरेशा गांभीर्याने घेत नसल्याचं आमच्या निदर्शनास आलं आहे. 

ज्येष्ठ अभिनेत्री आशालता ज्या मालिकेत काम करत होत्या, त्या सेटवर कोविड प्रोटोकाॅलचं पालन करण्यात हलगर्जीपणा झाला आहे का, याची चौकशी प्रशासन करेलच. मात्र आपल्या मनोरंजन वाहिनीच्या तसंच निर्मितीसंस्थेच्या मालिकांच्या सेटवर कोविड प्रोटोकाॅलचं सर्वोपतरी पालन करणं ही आपली वैयक्तिक जबाबदारी आहे, याचं भान प्रत्येक मनोरंजन वाहिनीने तसंच मालिकांच्या निर्मात्यांनी बाळगायलाच हवं. कोविड प्रोटोकाॅलच्या पालनात कोणतीही तडजोड किंवा हलगर्जी केल्यामुळे जर अभिनेते आणि तंत्रज्ञ यांचा जीव धोक्यात येत असेल, तर महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट कर्मचारी सेना मालिकांच्या चित्रीकरणास ठामपणे विरोध करेल. 


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा