Advertisement

लोकांच्या गाड्या जप्त केल्याच कशा? मनसे नेते नितीन सरदेसाई सरकारवर भडकले

सरकारला रोजच्या रोज निर्णय बदलायचे, वेगवेगळे नोटीफिकेशन काढून लोकांना त्रास द्यायचा हेच करायचं आहे का? सरकारने आधी स्वत:च नीट ठरवावं की लाॅकडाऊन अधिक कडक करायचं आहे की अनलाॅक सुरू करायचं आहे, असं नितीन सरदेसाई म्हणाले.

लोकांच्या गाड्या जप्त केल्याच कशा? मनसे नेते नितीन सरदेसाई सरकारवर भडकले
SHARES

लॉकडाऊन की अनलॉक? सरकारला नक्की काय अभिप्रेत आहे? कुठलाही निश्चित एक्झिट प्लान नसल्यामुळेच सरकार संभ्रमावस्थेत सापडलंय आणि लोकांच्या गाड्या जप्त करत सुटलंय, अशी टीका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते नितीन सरदेसाई (mns leader nitin sardesai criticises maharashtra government over lockdown extension) यांनी महाविकास आघाडी सरकारवर केली आहे.

पोलिसांची नाकाबंदी

गाड्या जप्त करण्याच्या निर्णयासंदर्भात नितीन सरदेसाई सरकारवर चांगलेच संतापले. ते म्हणाले, लाॅकडाऊन सुरू होऊन जवळपास सव्वातीन महिने पूर्ण झाले आहेत. महाराष्ट्रात ३१ जुलैपर्यंतचा नवीन लाॅकडाऊन सुरू झाला. पण हा लाॅकडाऊन जाहीर करताना इतकी संभ्रमावस्था निर्माण केली गेली की संपूर्ण मुंबई आणि इतर ठिकाणी पोलिसांनी अचानकपणे रस्त्यावरील गाड्या अडवण्यास सुरूवात केली. नक्की सरकारचा काय निर्णय झाला? आणि सरकारला काय अभिप्रेत आहे हे लोकांपर्यंत पोहोचण्याच्या पूर्वीच ही अॅक्शन सुरू झाली. अनेक लोकं आपल्या आॅफिसला जात असतील किंवा अन्य कुठल्याही कारणांसाठी बाहेर पडलेले असतील, तर त्यांच्या गाड्या थेट जप्त करण्यात आल्या आणि त्या कोर्टातून सोडवून घ्या, अशा पद्धतीचे निर्देश त्यांना देण्यात आले. मुंबईमध्ये अनेक ठिकाणी प्रचंड मोठा ट्राफिक जॅम झाला. कारण पोलिसांनी जागोजागी गाड्या अडवून नाकाबंदी सुरू केलेली होती. 

हेही वाचा - आम्हाला माफी मागायला सांगणारा, हा वरुण देसाई आहे कोण? - अमेय खोपकर

कामावर जायचं कसं?

एका बाजूला सरकार असं म्हणतंय की आम्हाला अर्थचक्राला गती द्यायची आहे. अर्थचक्राला गती देण्यासाठी तुम्ही अनेक व्यवसाय सुरू करण्यास परवानगी देत आहात. त्यात दुकाने आली, अनेक आॅफिस सुरू करण्यास सांगितलं. बँका आधीपासूनच सुरू असल्या तरी बँक कर्मचाऱ्यांनी आपल्या शाखेपर्यंत कसं पोहोचायचं याचं उत्तर अजूनही सरकारला देता आलेलं नाही. हे उद्योगधंदे सुरू करा असं म्हणायचं आणि त्यांची येण्या- जाण्याची व्यवस्था करायची नाही. ट्रेन अजूनही बंद आहेत, बसमध्ये सगळ्यांनाच परवानगी नाही. त्यात जे लोकं स्वत:च्या वाहनांनी प्रवास करत आहेत, त्यांना देखील अडवून त्यांच्यावर थेट कारवाई केली जात आहे. यांत मला मुंबई पोलिसांना दोष द्यायचा नाहीय, कारण ते सरकारी आदेशाचं पालन करत आहेत. जर सरकारच इतक्या संभ्रमावस्थेत असेल, तर लोकांनी पाहायचं कुणाकडे? असा प्रश्न सरदेसाई यांनी उपस्थित केला.

रोज वेगवेगळे निर्णय

सरकारला रोजच्या रोज निर्णय बदलायचे, वेगवेगळे नोटीफिकेशन काढून लोकांना त्रास द्यायचा हेच करायचं आहे का? सरकारने आधी स्वत:च नीट ठरवावं की लाॅकडाऊन अधिक कडक करायचं आहे की अनलाॅक सुरू करायचं आहे, कारण सरकारच्या अशा धोरणामुळे लोकांना प्रचंड मनस्ताप होत आहे. एक तर लोकांच्या नोकऱ्या जायची वेळ आलीय. गेल्या ३ महिन्यांत अनेकांना पगार मिळालेले नाहीत. या विवंचनेत असताना त्यांच्या गाड्या जप्त व्हायला लागल्या तर लोकांनी करायचं काय? सरकारला असे कुठलेही निर्णय घ्यायचे असतील, तर त्यांनी ३ ते ४ दिवस आधी त्याला प्रसिद्धी द्यावी, जनजागृती करावी त्यानंतर जे निर्णय घ्यायचे असतील ते घ्यावेत. एखाद्या रात्री अचानकपणे निर्णय घ्यायचा आणि सकाळी लोकांच्या गाड्या जप्त करायच्या हा पूर्णपणे चुकीचा निर्णय आहे. त्यामुळे सरकारने लोकांना हा लाॅकडाऊन आहे की अनलाॅक हे स्पष्टपणे सांगावं, अशी मागणीही सरदेसाई यांनी केली.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा