Advertisement

महाराष्ट्राच्या मंत्रालयाचा नवीन पत्ता “कृष्णकुंज”

विविध समस्यांनी त्रस्त असलेले अनेकजण मंत्रालयाची पायरी चढण्याऐवजी “कृष्णकुंज” दरबारी जाऊन दाद मागताना दिसत आहेत.

महाराष्ट्राच्या मंत्रालयाचा नवीन पत्ता “कृष्णकुंज”
SHARES

कोरोनाचं संकट आणि लाॅकडाऊनचा राज्यभरातील उद्योगधंदे, सेवा-सुविधांना आणि त्यावर अवलंबून असलेल्या सर्वसामान्य जनतेला मोठा फटका बसला आहे. या संकटातून सावरताना शासन म्हणून राज्य सरकारने दिलासा द्यावा, अशी प्रत्येकाचीच अपेक्षा असली, ही अपेक्षा पूर्ण न झाल्यास मंत्रालयाची पायरी चढण्याऐवजी अनेकजण “कृष्णकुंज” दरबारी जाऊन दाद मागताना दिसत आहेत. 

यावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (maharashtra navnirman sena) सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी ठाकरे सरकारला टोला लगावला आहे. “समस्या अनेक उपाय एक, महाराष्ट्राच्या मंत्रालयाचा नवीन पत्ता राज ठाकरे कृष्णकुंज शिवाजी पार्क दादर मुंबई २८” असं ट्विट संदीप देशपांडे यांनी केलं आहे.

राज्य सरकारने मिशन बिगीन अगेन अंतर्गत राज्यभरात हळुहळू अनलाॅक करायला सुरूवात केली. अटी-शर्थींच्या आधारे अनेक सेवा-सुविधा सुरू करण्यास मंजुरी देण्यात आली. तरीही कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून काही सुविधा बंदच ठेवण्यात आल्या होत्या. राज्य सरकारकडे मागणी करूनही त्याला अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याने अनेकांनी शेवटी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडे जाऊन आपलं गाऱ्हाणं मांडलं. 

हेही वाचा- नाट्य कलाकारांनी घेतली राज ठाकरेंची भेट

खासगी डाॅक्टर-परिचारीकांचं शिष्टमंडळ, त्र्यंबकेश्वर देवस्थानचे पुजारी, वारकरी, जीम चालक, कोळी भगिनी, बेस्टचे कंत्राटी कर्मचारी, डबेवाले, मूर्तीकार, वीजबिल ग्राहक, शिक्षक संघटना, नाट्य कलाकार राज ठाकरेंच्या (raj thackeray) भेटीला आले.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कर्मचाऱ्यांनी पुढाकार घेऊन रिक्षा चालकांच्या ईएमआयचा प्रश्न सोडवला, वीज बिल कमी करण्याच्या मागणीसाठी मनसेच्या शिष्टमंडळाने सरकारशी पत्रव्यवहार केला, अदानी, बेस्ट, महावितरणच्या अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली तसंच राज्यपालांचीही भेट घेतली. सर्वसामान्यांसाठी लोकल ट्रेन सुरू करण्यासाठी मनसेने आंदोलन केलं, रोजगाराचा प्रश्न लावून धरला, त्याचबरोबर मंदिरे उघडण्याची आग्रही मागणीही केली. 

राज ठाकरेंच्या मध्यस्तीने, तर कधी वक्तव्याने दबावात येऊन सरकारने हळुहळू सेवाही सुरू केल्या. यामुळे सगळ्यांचं लक्ष पुन्हा एकदा कृष्णकुंजकडे वेधलं गेलंय. मंत्रालयात जाण्याऐवजी कृष्णकुंजची पायरी चढल्यास समस्यांचं निराकारण होत असल्याची भावना सर्वसामान्यांमध्ये निर्माण झाली आहे. यावरच संदीप देशपांडे यांनी बोट ठेवलं आहे. 

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा