Advertisement

डाॅ. आंबेडकरांच्या वाक्यांत मुख्यमंत्र्यांना मनसेचं उत्तर


डाॅ. आंबेडकरांच्या वाक्यांत मुख्यमंत्र्यांना मनसेचं उत्तर
SHARES

भाजपाच्या खासदार पूनम महाजन यांच्यापाठोपाठ मुंबई परप्रांतीयांमुळे महान बनत असल्याचे उद्गार काढणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रतिउत्तर देण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या भाषिक राज्यपुनर्रचना मीमांसेतील मताचा आधार घेत 'शालजोडीतले' मारले आहे.

एरवी प्रत्येकाला आक्रमक भाषेत उत्तर देणाऱ्या मनसेच्या एकाही नेत्याने मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यावर थेट प्रतिक्रिया न देता सुरूवातीला भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मुंबई व महाराष्ट्राबद्दल व्यक्त केलेल्या मताचा आधार घेत प्रतिउत्तर देण्याचा प्रयत्न केला आहे. तशी एक पोस्टच मनसेच्या अधिकृत फेसबुक पेजवर आणि ट्विटवरून शेअर करण्यात आली आहे.



काय म्हटलंय मनसेनं पोस्टमध्ये?

महाराष्ट्राच्या अस्मितेवर वरवंटा फिरवून मुंबईतील मराठी माणसाचे, त्याच्या अस्तित्वाचे सातत्याने खच्चीकरण करण्याचा एककलमी कार्यक्रम सध्या भाजप नेत्यांनी सुरु केलाय. 'मुंबईतील उत्तर भारतीय तसेच वेगवेगळ्या राज्यातून येणारे लोक हे मुंबईला महान बनवतात' हे मुख्यमंत्री फडणवीसांचे विधान त्याच मोहिमेचा एक भाग. भाजपचे काही नेते तर मतांची लाचारी करत 'बघा बघा मुंबई कशी परप्रांतीयांनी बहरवली' असे गोडवे गाण्यात मश्गुल. खरं तर 'परप्रांतीयांनी मुंबई बहरवली नाही तर त्यांच्या अघोरी लोंढ्यामुळे आपली मुंबईच कुठेतरी हरवली'.
१०६ हुतात्म्यांनी आणि विद्वान मराठी पुढाऱ्यांनी प्रचंड लढा देऊन मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र मिळविला तो काय अशा प्रकारची संभावना सहन करण्यासाठी?
राष्ट्रीय नेते होण्याच्या महत्त्वाकांक्षेत स्व-राज्यातील माणसाचं खच्चीकरण करणारी वक्तव्य करणं म्हणजे पिचलेल्या पाठकण्याची लक्षणं. पण हा महाराष्ट्राचा इतिहास कधीच नव्हता. महाराष्ट्रात असे काही ताठ कण्याचे, मराठी बाण्याचे नेते होऊन गेले जे देशाच्या मोठमोठ्या पदावर विराजमान झाले पण महाराष्ट्राच्या अस्मितेशी कोणतीही तडजोड न करता...


मनसेनं गमावलं नानाचं मत 

दरम्यान पुण्यामधील ‘एनडीए’च्या दीक्षांत समारंभाला उपस्थित असलेले अभिनेते नाना पाटेकर यांनी ‘मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी त्यांचा मुद्दा मांडला आणि मी माझं मत मांडलं. यामुळे राज यांचं काही नुकसान झालं नाही, मात्र मनसेचं एक मत गेलं’, अशा शब्दांत मनसेला टोला लगावला.

काही दिवसांपूर्वी फेरीवाल्यांच्या मुद्द्यावर नाना पाटेकर यांनी फेरीवाल्यांच्या बाजूने सूर लावल्याने मनसे नेते आक्रमक झाले होते. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ''नानांनी माहिती नाही, त्यात उगाच चोंबडेपणा करू नये'', अशा शब्दांत टीका केली होती.



मुख्यमंत्र्यांना भैया भूषण पुरस्कार मिळेल 

मुख्यमंत्र्यांच्या या वक्तव्यानंतर मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी तर येण्याऱ्या काळात महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना महाराष्ट्र भूषण नाही, पण भैया भूषण पुरस्कार नक्की मिळेल, अशी खोचक टीका ट्विटरवरून केली आहे.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा