मनसेची 'वॉररुम' कोणासाठी?

  Dadar
  मनसेची 'वॉररुम' कोणासाठी?
  मुंबई  -  

  मुंबई - महापालिका निवडणुकीसाठी मनसेच्या वतीने दादर- माहीम मतदार संघातील उमेदवारांचा प्रचार करण्यासाठी बनवण्यात आलेली वॉर रूम कुणासाठी? असाच प्रश्न मनसैनिकांना पडला आहे.

  या 'वॉररूम'च्या उदघाटन प्रसंगी वाद निर्माण झाला होता. पण निवडणूक प्रचार ऐन झोकात सुरू असतानाच दादर- माहीममधील मनसेच्या उमेदवारांना याचा लाभ मिळवून दिला जात नाहीये. केवळ संदीप देशपांडे यांची पत्नी स्वप्ना आणि संतोष धुरी या दोघांचाच प्रचार येथून केला जातोय. पण अन्य मनसे उमेदवारांना याचा कोणताही लाभ मिळू दिला जात नाही.

  दादर- माहीम विधानसभा मतदार संघातून राजन पारकर(182), भारती वीरेंद्र तांडेल (190), स्वप्ना संदीप देशपांडे (191), स्नेहल सुधीर जाधव (192), रोहित कोळी (193) आणि संतोष धुरी (194) हे निवडणूक रिंगणात आहेत. परंतु मनसेच्या या वॉर रूममधून स्वप्ना देशपांडे आणि संतोष धुरी या दोनच उमेदवारांचा प्रचार केला जातोय. ही 'वॉररूम' मनसेच्या सर्व उमेदवारांसाठी असेल असे मनसे विभागप्रमुख संदीप देशपांडे यांनी जाहीर केले होते. पण प्रत्यक्षात या वॉररूमचा फायदा ना दादर- माहिममधील मनसेच्या उमेदवारांना होत आहे ना संपूर्ण मुंबईतील उमेदवारांना होत आहे. त्यामुळे ही 'वॉररूम' नक्की कुणासाठी? असे म्हणण्याची वेळ मनसेच्या उमेदवार, कार्यकर्त्यांवर आली आहे.

  ही 'वॉररूम' दादर- माहीममधील मनसे उमेदवारांसाठी आहे. तसेच पक्ष नेत्यांच्या प्रचार सभेसाठी आणि या भागातील उमेदवारांच्या प्रचारासाठी याचा वापर केला जात आहे. आतापर्यंत आपला आणि संतोष धुरी यांचाच फेसबुक लाईव्ह इंटरव्ह्यू झाला आहे, अशी प्रतिक्रिया मनसेचे विभागप्रमुख संदीप देशपांडे यांनी मुंबई लाइव्हला दिली आहे.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.