नरिमन पॉईंट - देशातील काळा पैसा बाहेर यावा तसेच अतिरेकी कारवाईंना आळा बसावा याकरिता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटबंदीचा कार्यक्रम जाहीर केला. ज्याच्याकडे काळापैसा होता त्यांनी तो नोटबंदीचा निर्णय जाहीर होण्यापूर्वीच बॅंकेत पैसा जमा केला आहे. नोटबंदीच्या निर्णयानंतर विविध बॅंकामध्ये एकूण किती पैसा जमा झाला याबाबत सरकारने जाहीर केलेली आणि आरबीआयने बुलेटीनच्या माध्यमातून जाहीर केलेल्या आकडेवारीमध्ये विसंगती आहे. ही जनतेची फसवणूक असून, पंतप्रधान दिशाभूल करत असल्याची टीका भारिपचे अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. या दोन्ही अहवालामधील नक्की खरा रिपोर्ट कोणता याचा खुलासा पंतप्रधानांनी केला पाहिजे असे त्यांनी म्हटले.
किती काळा पैसा बँकामध्ये जमा झाला याची माहिती आरबीआयने जाहीर केली पाहिजे. नोटबंदीमुळे आता चांगली परिस्थिती आहे असे सरकार भासवत असले तरी खरी परिस्थिती वेगळी आहे. स्वत:कडे पैसा जमा करून ठेवण्याकडे लोकांचा कल वाढला आहे. नोटबंदीचा निर्णय मागे घेण्याबाबत काँग्रेसने केलेली मागणी चुकीची असल्याचे अॅड. आंबेडकर म्हणाले. जगातील प्रगत देशामध्ये देखील 40 टक्के व्यवहार रोखीने होतात. आमचा नोटबंदी निर्णयाला विरोध आहे. मोदींनी आपली प्रतिमा उंचविण्यासाठी नोटबंदीचा निर्णय घेतला असल्याचा आरोप यावेळी केला. यावेळी सीपीआयचे बी. के. कांगो आणि लाल निशानचे मिलिंद रानडे हजर होते.