राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने लोकसभा निवडणुकीच्या निकालावर भाष्य केलं आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्रामध्ये भाजपाच्या निराशाजनक कामगिरीचं विश्लेषण करताना थेट अजित पवारांचा उल्लेख करत भाजपाच्या राज्यातील नेत्यांच्या धोरणांवर संघाने निशाणा साधला आहे.
महाराष्ट्रात अजित पवारांशी केलेली हातमिळवणी आणि काँग्रेसच्या नेत्यांना पक्षात घेतल्यामुळे भाजपच्या ‘ब्रँड’ला धक्का बसल्याचा टोला संघाचं मुखपत्र असलेल्या 'ऑर्गनायझर'मधून लगावण्यात आला आहे.
अजित पवारांना सोबत का घेतले?
'ऑर्गनायझर’ मासिकाच्या अंकात संघाचे आजीव स्वयंसेवक असलेल्या रतन शारदा यांनी लिहिलेल्या लेखामध्ये लोकसभेच्या निकालांचं विश्लेषण करण्यात आलं आहे. यामध्ये महाराष्ट्रातील कामागिरीवर विशेष नाराजी व्यक्त करण्यात आली आहे.
महाराष्ट्रात भाजप आणि शिंदेंची शिवसेना यांच्याकडे पुरेसे बहुमत असताना अजित पवारांना सोबत का घेतले, हा प्रश्नच आहे, असं या लेखात म्हटलं आहे. साधारण अडीच वर्षापूर्वी एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली शिवसेनेमधून बाहेर पडलेल्या आमदारांच्या मदतीने भाजपाने राज्यात सरकार स्थापन केलं होतं.
त्यानंतर 2023 मध्ये मे महिन्यात अजित पवार यांच्यासहीत आमदारांचा मोठा गट मूळ राष्ट्रवादी काँग्रेसमधून बाहेर पडला आणि शिंदे सरकारबरोबर सत्तेत सहभागी झाला. मात्र अजित पवार गटाला का सत्तेत घेतलं हे नकळण्यासारखं असल्याचं संघाने म्हटलं आहे.
"अनावश्यक राजकारण तसेच हेराफेरीचं उत्तम उदाहरण म्हणून महाराष्ट्राकडे पाहता येईल. महाराष्ट्रात जे घडलं ते टाळता आलं असतं. अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीचा गट भाजपमध्ये सामील झाला. खरं तर भाजपा आणि शिवसेना (शिंदे गटाला) सहज बहुमत मिळालं असतं.
पुढील 2 ते 3 वर्षांमध्ये शरद पवारांच्या पक्षाला राष्ट्रवादी पक्षाला अंतर्गत कलहामुळे उतरती कळा लागली असती," असं 'ऑर्गनायझर'मध्ये म्हटलं आहे.
हेही वाचा