Advertisement

मंत्रालयात सापडले ३ लाख उंदीर!


मंत्रालयात सापडले ३ लाख उंदीर!
SHARES

चिक्की घोटाळा, कोळसा घोटाळा, पोषण आहार घोटाळा असे अनेक विषय आजवर महाराष्ट्राच्या विधानभवनाने पाहिले आहेत. पण आता एक नवीनच घोटाळा विधानभवनात सध्या गाजतोय. आणि तो आहे 'उंदीर घोटाळा'!


नाथाभाऊंनी विचारला जाब

संपूर्ण राज्याचं सरकार जिथून चालतं, त्या मंत्रालयातच उंदीर घोटाळा झाल्याचा आरोप भाजपाचेच ज्येष्ठ नेते आणि आमदार एकनाथ खडसे यांनी केला आहे. मंत्रीमंडळापासून दूर ठेवण्यात आल्यापासून नाथाभाऊंनी आपल्याच सरकारवर आरोप करण्याची एकही संधी सोडलेली नाही. त्यामुळे आत्तापर्यंत वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये सरकारला जाब विचारणाऱ्या एकनाथ खडसेंनी आता सरकारला मंत्रालयातल्या उंदीर घोटाळ्याप्रकरणी जाब विचारला आहे.



३ लाख १९ हजार उंदरांचा सुळसुळाट!

मंत्रालयात उंदरांचा सुळसुळाट झाला असून मंत्रालयात वारंवार उंदीर दिसणे, वस्तू व फायली कुरतडत असल्याचे निदर्शनास आले होते. यावर विशेष मोहीम राबवण्याचा निर्णय शासनाकडून घेण्यात आला. त्यासाठी उंदरांची मोजणीही करण्यात आली. या मोजणीनुसार मंत्रालयात ३ लाख १९ हजार ४०० उंदीर असल्याचं आढळून आल्याची माहिती खडसेंनी विधानसभेत दिली.

आता इतके उंदीर आढळल्याने सरकारने तातडीने उंदीर मारण्याची मोहीम राबवण्यासाठी एका खाजगी कंपनीला उंदीर निर्मूलनाचे कॉन्ट्रॅक्ट दिले. सदर कंपनीशी करण्यात आलेल्या करारानुसार 6 महिन्यांत सर्व उंदरांचं निर्मूलन करण्याचं ठरल्याचं नाथाभाऊंनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिलं.



दिवसाला मारले ४५ हजार उंदीर!

ही खासगी कंपनी इतकी चांगली निघाली की त्यांनी अवघ्या ७दिवसांतच सगळेच्या सगळे उंदीर मारल्याचं सांगण्यात आलं. त्यानुसार या कंपनीने दिवसाला ४५ हजार ७०० उंदीर मारल्याचं सांगितलं गेलं. त्यामुळे या कंपनीने मिनिटाला 31.68 उंदीर मारल्याचा हिशोब खडसेंनी सभागृहाला अवगत करून दिला. त्याउपर जाऊन या उंदरांची विल्हेवाट कशी? आणि कुठे लावली? याचीही काही माहिती सदर कंपनीने दिली नसल्याचं एकनाथ खडसेंनी सांगितले.

ज्या कंपनीला हे कॉन्ट्रॅक्ट दिलं गेलं, त्या कंपनीकडे विष हाताळण्याचं लायसन्स नव्हतं. तसंच, त्यासाठी त्यांनी सामान्य प्रशासन विभाग किंवा गृह विभागाकडूनही कोणतीच परवानगी घेतली असल्याची कागदपत्रे उपलब्ध नसल्याची माहिती नाथाभाऊंनी दिली.


धर्मा पाटील प्रकरणी गंभीर आरोप

यावेळी बोलताना एकनाथ खडसेंनी धर्मा पाटील आत्महत्या प्रकरणी सरकारवर गंभीर आरोप केला. मंत्रालायात विष आणण्यास परवानगी नाही. मात्र, धर्मा पाटील यांनी बाहेरुन विष आणलं नव्हतं, तर ते त्यांनी मंत्रालयात असलेलं उंदीर मारण्याचं विष प्राशन केल्याचा खळबळजनक दावा एकनाथ खडसेंनी यावेळी बोलताना केला.


उंदीर घोटाळ्याच्या चौकशीची मागणी

जिथं मुंबई महानगरपालिका आख्ख्या मुंबईत 6 लाख उंदीर मारल्याचं सांगते, तिथे ही कंपनी 7 दिवसांत 3 लाख उंदीर मारल्याचं सांगते, तेव्हा याची चौकशी व्हावी आणि संबंधित कर्मचाऱ्यांवर कारवाई व्हावी, अशी मागणी खडसे यांनी यावेळी केली.



हेही वाचा

सुनिल गावस्कर मंत्रालयात अवतरतात तेव्हा!


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा