Advertisement

कोस्टल रोडसाठी बोगद्यांच्या खोदकामाला सुरूवात

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बृहन्मुंबई महापालिकेच्या सागरी किनारा मार्गासाठी दोन महाबोगदे खणणारं ‘मावळा’ हे संयंत्र कार्यान्वित केलं.

कोस्टल रोडसाठी बोगद्यांच्या खोदकामाला सुरूवात
SHARES

कोणतंही काम पुढे नेताना केवळ नेता असून भागत नाही. त्यासाठी लढवय्या मावळ्यांची गरज असते. तसं या कामात मावळा यंत्राचं काम असेल, असं म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांनी बृहन्मुंबई महापालिकेच्या सागरी किनारा मार्गासाठी दोन महाबोगदे खणणारं ‘मावळा’ हे संयंत्र कार्यान्वित केलं.

यावेळी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, कोरोना विरुद्धची लढाई यशस्वी केल्यानंतर आता मुंबईच्या विकासाची लढाई सुरु झाली आहे. मुंबईच्या विकासाची लढाई आपण नक्की जिंकूच आणि यासाठी जगात उपलब्ध असलेले सर्वोत्तम असे, जे जे तंत्रज्ञान, विज्ञान असेल ते आणण्याची आपली परंपरा कायम ठेवू. 

२०१२ आधीच आपण कोस्टल रोडची संकल्पना मांडली होती. वांद्रे- वरळी सी-लिंकलाच पुढे जोडणारा हा मार्ग असेल, अशी संकल्पना होती. मुंबईला सुंदर असा समुद्र किनारा लाभला आहे. परंतु मुंबईत क्षितीज म्हणजे सी लिंक अशी ओळख भविष्यात होऊ नये यासाठी हा मार्ग भुयारी पद्धतीने तयार करण्याचा निर्णय घेतला. 

महापालिकेने (bmc) कोस्टल रोडच्या उभारणीसाठी अप्रतिम असं नियोजन केलं होतं. कामही धुमधडाक्यात सुरु केलं होतं. परंतु मध्येच कोरोनाचं संकट आलं. अजूनही ते गेलेलं नाही. या काळात अनेक गोष्टी ठप्प झाल्या असतानाही, या कोस्टल रोडचं काम मंदावू दिलेलं नाही, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलं.

हेही वाचा- कोस्टल रोडसाठी 'मावळा' खोदणार महाबोगदा; मुख्यमंत्र्यांनी दाखवला हिरवा कंदिल

मावळा मशीन नेमकं काय आहे?

बोगदा खणणारं मावळा मशीन (टीबीएमचा) हे या प्रकल्पातील महत्त्वाचं साधन आहे. या टीबीएम मशीनला ‘मावळा’ असे नाव देण्यात आलं आहे. हे अजस्त्र यंत्र १२.१९. मीटर व्यासाचं आहे. देशात आतापर्यंत वापरण्यात येणारं सर्वात मोठ्या व्यासाचं टीबीएम मशीन आहे. तयार होणाऱ्या ११ मीटर बोगद्यात सर्व सुरक्षेची व्यवस्था असेल. अरबी समुद्राखालील तब्बल १७५ एकर जमिनीवर भराव टाकण्यात आला आहे. तर अजून १०२ एकर समुद्राखालील जमिनीवर भराव टाकण्यात येणार आहे. या मार्गावर समुद्राखालून ४०० मीटरचे बोगदे असतील. हे बोगदे खोदण्याचं काम मावळा करणार आहे.

महाबोगदे खणण्याची सुरुवात मुंबईतील (mumbai) प्रियदर्शनी पार्क इथून करण्यात आली. हे बोगदे प्रियदर्शनी पार्क ते नेताजी सुभाष मार्गालगत (मरिन ड्राईव्ह) असणाऱ्या ‘छोटा चौपाटी’पर्यंत असणार असून ते ‘मलबार हिल’ च्या खालून जाणार आहेत.

दोन्ही बोगदे हे जमिनीखाली १० मीटर ते ७० मीटर एवढ्या खोलीवर असणार आहेत. दोन्ही बोगद्यांची लांबी ही प्रत्येकी २.०७ किलोमीटर इतकी असणार आहे. भारतातील महानगरांमधील रस्ते बोगद्यांमध्ये अशा प्रकारची यंत्रणा भारतात पहिल्यांदाच बसविण्यात येणार आहे. सागरी किनारा मार्गाच्या एकूण कामापैकी २० टक्के काम आतापर्यंत पूर्ण झालं आहे. शामलदास गांधी मार्गावरील उड्डाणपूल (Princess street flyover) ते वरळी या दरम्यान १०.५८ किमी लांबीचा हा ‘सागरी किनारा मार्ग’ असेल.

(mumbai coastal road tunnel work start by bmc)

हेही वाचा- कोस्टल रोड: प्रियदर्शनी पार्क ते प्रिन्सेस स्ट्रिट बोगद्याच्या कामाची सुरूवात होणार

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा