SHARE

मनसे आणि फेरीवाला वाद आता चांगलाच रंगण्याची चिन्हे आहेत. त्याचे कारण आहे मनसे नेत्यावर पुन्हा झालेला हल्ला. मुंबईत रविवारी पुन्हा एकदा मनसे नेत्यांवर हल्ला झाला. विक्रोळीमधील उपविभाग अध्यक्ष विश्वजीत ढोलम आणि विनोद शिंदे यांच्यावर रविवारी फेरीवाल्यांनी हल्ला केला. यावेळी मनसेचे उपशाखा अध्यक्ष उपेंद्र शेवाळेंच्या डोक्यात पेव्हर ब्लॉक घालून हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात शेवाळेंच्या कवटीला फ्रॅक्चर झाले असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे.


राज ठाकरेंनी बोलावली तातडीची बैठक

दरम्यान, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी या पार्श्वभूमीवर मनसे विभाग अध्यक्षांची सोमवारी तातडीची बैठक बोलवली आहे. मनसेचे विक्रोळीतले उपविभाग अध्यक्ष विश्वजीत ढोलम एका दुकानावर मराठी पाटी लावावी या मागणीसंदर्भात दुकानदाराला भेटण्यासाठी गेले होते. दुकानदार आणि ढोलम यांची चर्चा सुरू असताना परिसरातले फेरीवाले तिथे गोळा झाले, त्यांनी ढोलम आणि शिंदे यांच्यावर हल्ला करत त्यांना बेदम मारहाण केली.


मनसेच्या आणखी कार्यकर्त्यांनाही मारहाण

विश्वजीत ढोलम यांच्या डोक्याला दुखापत झाली असून त्यांना उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. विश्वजीत ढोलम यांना मारहाण झाल्यानंतर मनसेचे पदाधिकारी पुन्हा त्या व्यापाऱ्याकडे जाब विचारायला गेले होते. तेव्हा फेरीवाल्यांनी मनसे कार्यकर्त्यांना अजून मारहाण केली. या मारहाणीत शिंदे आणि उपेंद्र शेवाळे हे जखमी झाले. काही दिवसांपूर्वी मनसेचे मालाडमधले नेते सुशांत माळवदे यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला होता. त्यानंतर आता हा मनसे कार्यकर्त्यांवर झालेला हा दुसरा हल्ला आहे. त्यामुळे मनसे विरुद्ध फेरीवाला हा वाद पुन्हा रंगणार यात शंका नाही.


संजय निरुपम यांनी केले ट्विट

मनसेच्या पदाधिकाऱ्यांना मारहाण केल्यानंतर मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांनी समर्थन करत 'विक्रोळीत मनसेच्या गुंडांनी पुन्हा मार खाल्ला, आमचा हिंसेवर विश्वास नाही. पण गरीबांच्या पोटावर जेव्हा मनसेचे गुंड लाथ मारणार तेव्हा प्रतिक्रिया ही उमटणारच. त्यामुेळे मनसेने गुंडगिरी सोडून द्यावी', असे ट्विट संजय निरुपम यांनी केले आहे. संबंधित विषय
ताज्या बातम्या