नाना आंबोले भाजपाचे मुंबई उपाध्यक्ष

 Mumbai
नाना आंबोले भाजपाचे मुंबई उपाध्यक्ष

शिवसेनेला राम राम करून भाजपात प्रवेश केलेल्या लालबाग-परळमधील नाना आंबोले यांची भाजपाच्या उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. नाना आंबोले यांना बेस्ट समिती सदस्यपद देण्यात आले होते. परंतु त्यांनी हे सदस्यपद अन्य कुणाला दिले जावे, त्यापेक्षा आपण पक्षाचे काम करू अशी विनंती केली होती. त्यामुळे आंबोले यांच्यावर भाजपाच्या मुंबई उपाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

शिवसेनेचे नगरसेवक आणि बेस्ट समितीचे माजी अध्यक्ष नाना आंबोले यांना महापालिका सार्वत्रिक निवडणूक 2017 मध्ये उमेदवारी न दिल्यामुळे त्यांनी भाजपात प्रवेश केला. भाजपाने आंबोले यांच्या पत्नीला लालबागमधून उमेदवारी दिली. परंतु या निवडणुकीत आंबोले यांच्या पत्नीचा पराभव झाला आणि शिवसेनेच्या उमेदवार सिंधुताई मसुरकर या विजयी झाल्या. आंबोले यांच्या पराभवानंतर भाजपाने त्यांचा सन्मान राखत बेस्ट समितीवर सदस्य म्हणून नियुक्ती केली. परंतु हे सदस्य पक्षातील अन्य कुणाला देऊन आपल्याला केवळ पक्षाचे काम करू द्यावे, अशी विनंती आंबोले यांनी भाजपाचे मुंबई अध्यक्ष अॅड. आशिष शेलार यांच्याकडे केली होती. त्यानंतर 14 एप्रिल 2017 रोजी भाजपाचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी आंबोले यांची मुंबईच्या उपाध्यक्षपदी नियुक्ती केल्याचे जाहीर केले. आगामी काळात आपल्याला दिलेली जबाबदारी आपण यशस्वीपणे पार पाडाल आणि पक्ष वाढीकरता आपले पूर्ण योगदान द्याल असा विश्वास शेलार यांनी व्यक्त केला. आंबोले यांनीही आपण ही जबाबदारी योग्यरितीने पार पाडू, अशी ग्वाही दिली.

Loading Comments