Advertisement

शिवसेनेत पदं आणि टक्केवारीला महत्व - राणे


शिवसेनेत पदं आणि टक्केवारीला महत्व - राणे
SHARES

विधान परिषदेमध्ये जीएसटी चर्चेदरम्यान सोमवारी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे आणि शिवसेना आमदार अनिल परब यांच्यामध्ये खडाजंगी पहायला मिळाली. विधान परिषदेमध्ये नारायण राणे यांनी जीएसटी विधेयकावर भाषण करताना शिवसेनेवर जोरदार निशाणा साधला.

शिवसेनेमध्ये पदं आणि टक्केवारीत जास्त रस आहे. एकीकडे भाषणात म्हणतात सरकार दरोडेखोर आहे आणि दुसरीकडे त्याच सरकारमध्ये शिवसेनेचे नेते भागीदार म्हणून मांडीला मांडी लावून बसतात. मग दरोडेखोरीत पण भागीदारी आहे का? शेतकऱ्यांच्या प्रश्नावर गप्प बसलेत. शिवसेनेची एकेकाळी दहशत होती पण आता हिंमत संपली आहे. आज मुंबईत काही उरलेले नाही. टेक्स्टाईल दक्षिण भारतात गेला आहे. डायमंड मार्केट बाहेर गेले आहे. माझगाव गोदी बाहेर नेण्यात आली आहे. रिझर्व्ह बँक मुंबईबाहेर नेण्यात आली आहे. जे मुंबई घेऊन बसलेत त्यांना आज मुंबईत काय आहे माहिती आहे का? असा सवाल उपस्थित करत राणे यांनी शिवसेनेवर प्रहार केला.

राणेंच्या या आरोपांना शिवसेना आमदार अनिल परब यांनीही प्रत्युत्तर दिले. शिवसेनेची काय ताकद अाहे हे तुम्हाला चांगले माहिती आहे. शिवसेनेमुळे तुम्ही खालच्या सभागृहात राजे होता. पण दुर्दैवाने आज तुम्हाला शिवसेनेमुळेच या वरच्या सभागृहात यावे लागले. शिवसेनेच्या ताकदीची काळजी तुम्ही करू नका. नारायण राणे यांनी पक्ष सोडल्यानंतर 2007, 2012 आणि 2017 या निवडणुकांमध्ये मुंबई महापालिकेत शिवसेनेने ताकद दाखवून दिली आहे. मध्यंतरी जी काही चर्चा चालू होती तसे घडले असते आणि तुम्ही भाजपामध्ये गेला असता तर आज जीएसटीच्या बाजूने बोलला असता. त्यामुळे शिवसेनेची चिंता नारायण राणे यांनी करू नये असं सांगत अनिल परब यांनी राणेंवर जोरदार टीका केली.

अनिल परब यांच्या प्रत्युत्तरावर नारायण राणे यांनीही पलटवार केला. शिवसेनेची ताकद कमी झाली ही वस्तुस्थिती पाहून बोलत आहे. अकोला, कल्याण आणि मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या वेळी उद्धव ठाकरे यांनी भाषणे केली. त्याचा संदर्भ घेऊन बोललो. शिवसेनेत पूर्वी ज्याप्रमाणे बोललेले घडायचे तसे आता घडत नाही. लोकशाहीत सत्तेत असणाऱ्यांनी सत्तेच्या बाजूने बोलायचे असतेेेे. सत्तेत राहून विरोधात बोलयाचे नाही असे सांगायचे होते. घोषणा, भाषणे होतात, मात्र प्रतिक्रिया उमटत नाहीत. तेव्हाची शिवसेना आणि आताची शिवसेना, तेव्हाचे शिवसेैनिक आणि आताचे शिवसैनिक यांच्यात फरक आहे, अशी टीकाही राणेंनी केली.

जीएसटीच्या चर्चेच्या माध्यमातून विरोधी पक्षांनी भाजपापेक्षा शिवसेनाला लक्ष्य करण्यामध्ये स्वारस्य दाखविले. मात्र नारायण राणे आणि शिवसेना नेत्यांमधील खडाजंगी पुन्हा एकदा सभागृहाला बघायला मिळाली.

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा