Advertisement

मुख्यमंत्र्यांकडून राणेंना ग्रीन सिग्नल, पण...


मुख्यमंत्र्यांकडून राणेंना ग्रीन सिग्नल, पण...
SHARES

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांच्या भाजपा प्रवेशाला तारीख पे तारीखचे शुक्लकाष्ठ लागले आहे. गेल्या काही महिन्यांपासून सुरू झालेला हा डेली सोप दर आठवड्यागणिक तारखा बदलून पुढे पुढे खेचला जात आहे. आता राणे २७ ऑगस्टच्या मुहूर्तावर भाजपाप्रवेश करतील, अशी चर्चा असतानाच 'मुंबई लाइव्ह'ला विश्वसनीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा राणेंना असलेला विरोध आता मावळला आहे. परंतु, राणेंना राज्यात न ठेवता त्यांच्या अनुभवाचा वापर आता केंद्रीय स्तरावर व्हावा, अशी गळ भाजपाच्या केंद्रीय नेतृत्त्वाला मुख्यमंत्र्यांनी घातली आहे.

राणे हे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री. त्यामुळे, त्यांना राज्यात महत्त्वाचे मंत्रीपद द्यावे लागणार. त्यातच राणेंचा स्वभाव हा आक्रमक! त्यामुळे ते स्वपक्षीयांवर टीका करताना देखील मागे पुढे बघत नाहीत. हेच मुख्यमंत्र्यांना नको आहे. म्हणून राणेंना राज्यात नको तर केंद्रात घ्यावे, असा आग्रह मुख्यमंत्र्यांनी दिल्लीतील बैठकीत धरल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.


प्रमोद जठार दिल्लीत कशासाठी?

राणेंच्या प्रवेशाबाबत दिल्लीत घडणाऱ्या चर्चांमध्ये भाजपाचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांनाही सहभागी करून घेतल्याचे समजते. जठार हे कट्टर राणेविरोधक आहेत. राणेंच्या प्रवेशानंतर त्यांचे भवितव्य काय असेल? हा प्रश्न आहेच. परंतु, जठार यांचे मत कितपत ग्राह्य धरले जाईल, हेही सांगता येत नाही.


नितेश राणेंचे काय होणार?

नारायण राणे भाजपामध्ये गेले आणि केंद्रात मंत्रिपद मिळाले तरी सध्याचे काँग्रेस आमदार नितेश राणे यांचे भवितव्य काय राहणार? हे गुलदस्त्यातच आहे. काँग्रेस आमदारकीचा राजीनामा देऊन पुन्हा पोट निवडणुकीला सामोरे जावे लागले, तर नितेश राणेंविरोधात काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी एकत्र येण्याची शक्यता आहे.


कालिदास कोळंबकरांचे काय ?

राणे यांना कायम साथ देणारे कालिदास कोळंबकर हे देखील राणेंसोबत काँग्रेसला रामराम ठोकतील, अशी चर्चा आहे. मात्र, कालिदास कोळंबकर भाजपामध्ये आले तर त्यांचे काय? त्यांना मंत्रीपद मिळेल की नाही यापेक्षाही ते पुन्हा निवडून येऊ शकतील का? हाच महत्त्वाचा प्रश्न आहे.


मुख्यमंत्र्यांना का नकोत राणे?

नारायण राणे हे आक्रमक आहेत. २००५ मध्ये शिवसेना सोडली तेव्हा त्यांनी सोनिया गांधींकडे मुख्यमंत्री पद मागितले होते. पण, ते त्यांना शेवटपर्यंत मिळाले नाही. त्या धुसफूस आणि कटुतेतूनच त्यांनी सोनिया आणि राहूल गांधी यांना थेट टार्गेट केले होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना धोका निर्माण करू शकणारे एकनाथ खडसे, विनोद तावडे, पंकजा मुंडे यांना पद्धतशीरपणे बाजूला करण्यात आले. मात्र, राणे आले तर त्यांना महत्त्वाचे पद द्यावे लागेल. त्यामुळे, मंत्रिमंडळामध्ये दोन गट तयार होतील. प्रशासनात समांतर यंत्रणा निर्माण होऊन धोका नको, ही काळजी मुख्यमंत्री घेणारच!
- विवेक भावसार, ज्येष्ठ पत्रकार



हेही वाचा - 

भाजपा प्रवेश 'राणे स्टाइल`मध्ये!

नारायण राणे पु्न्हा दिल्ली दरबारी


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा