भाजपा प्रवेश 'राणे स्टाइल`मध्ये!


  • भाजपा प्रवेश 'राणे स्टाइल`मध्ये!
SHARE

गेल्या काही महिन्यांपासून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि आमदार नारायण राणे भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करणार अशा बातम्या प्रसारित होत आहेत. आता देखील राणेंचा प्रवेश 27 ऑगस्टला होणार अशी चर्चा आहे. मात्र राणेंचा प्रवेश हा 'राणे स्टाइल'मध्येच होणार, अशी माहिती अतिशय विश्वसनीय सूत्रांनी मुंबई लाईव्हला दिली आहे. प्रवेशाची तारीख याक्षणापर्यंत निश्चित झाली नसली तरी जर राणेंचा प्रवेश झाला तर तो 'राणे स्टाइल'मध्ये होईल असा दावा राणे यांच्या निकटवर्तीयाने केला आहे.


राणेंची अहमदाबादमध्ये भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांच्याशी झालेली भेट तसंच त्यांच्या भाजपात प्रवेशाच्या नियोजित तारखा 'योग्य वेळेआधी'च माध्यमांपर्यंत पोहोचल्याने राणेंचा भाजपा प्रवेश लांबला. काही दिवस प्रतिक्षा केल्यानंतर राणे यांच्या भाजपा प्रवेशाबाबत जुळवाजुळवीला सुरूवात झाली आहे. राणे आता स्वतःच्या स्टाइल मध्ये भाजपा प्रवेश करण्यासाठी आतुर आहेत. 


नितेश राणे यांचा डी पी बदलला

दरम्यान, नारायण राणे यांचे आमदार पुत्र नितेश राणे यांनी स्वतःच्या व्हॉटस अॅप अकाउंटचा डिस्प्ले पिक्चर (डीपी) बदलला आहे. नारायण राणे यांची छबी दाखवणाऱ्या या डी पीवर 'नारायण राणे हाच आमचा पक्ष' असा संदेश लिहिला आहे. या छबीच्या पार्श्वभूमीला भगवी छटा आहे, हे विशेष.
कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम 

कोकणात आणि संपूर्ण महाराष्ट्रात राणे समर्थक मोठ्या प्रमाणात आहेत. मात्र, या कार्यकर्त्यांनाही अद्याप कसल्याच सूचना देण्यात आलेल्या नाहीत. जर, राणेंचा प्रवेश येत्या  27 ला असता तर एव्हाना कार्यकर्ते कामाला लागले असते. मात्र अजून तरी तसं चित्र दिसत नाही. विशेष म्हणजे, कोकणात गणेशोत्सव हा सर्वात महत्त्वाचा सण. हा सण साजरा करण्यासाठी मोठ्या संख्येने चाकरमानी कोकणात जातात. त्यांच्या स्वागतासाठी   रस्त्यावर विविध पक्षांचे शुभेच्छा फलक लावले जातात. मात्र, राणेंचा अजून भाजपा प्रवेश निश्चित न झाल्यामुळे बॅनर नेमका कोणत्या पक्षाचा लावायचा, असा संभ्रम कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झाला आहे.


प्रमोद जठार, राजन तेली यांचे काय?

नारायण राणे यांनी भाजपामध्ये प्रवेश केल्यास राणेंचे एकेकाळचे कट्टर समर्थक आणि काही वर्षांपूर्वी भाजपामध्ये आलेल्या राजन तेली यांचे काय? असा प्रश्न देखील निर्माण झाला आहे. राणे यांना भाजपामध्ये घेऊ नये, यासाठी तेली प्रयत्न करत असल्याची चर्चा सध्या सुरू आहे.
तर, दुसरीकडे प्रमोद जठार यांच्यासमोर देखील पेच निर्माण झाला आहे. त्याचे कारण आहे कणकवली मतदार संघ. राणे भाजपामध्ये आले तर आमदार असलेल्या नितेश राणे यांच्यासाठी कणकवली मतदार संघ भाजपाला सोडावा लागणार आहे. त्यामुळे इतकी वर्षे जिल्ह्यात भाजपासाठी काम करणाऱ्या प्रमोद जठार यांचे काय? हा देखील चर्चेचा विषय सध्या जिल्ह्यात रंगला आहे.हे देखील वाचा -

राणेंचा भाजपाप्रवेश 'मुंबई लाइव्ह'च्या वृत्तामुळे लांबला


 

डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी जोडलेली प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)


संबंधित विषय
ताज्या बातम्या