Advertisement

नाहीतर सगळी गुपीतं बाहेर काढेन, राणेंचा इशारा

नारायण राणेच्या पाठी लागू नका, नाहीतर तुमची सगळीच गुपीतं बाहेर काढावी लागतील.

नाहीतर सगळी गुपीतं बाहेर काढेन, राणेंचा इशारा
SHARES

मला झालेली अटक ही कायद्यानुसार झालेली नाही. ही केवळ सत्ता मिळाल्याची मस्ती आहे. मला एवढंच सांगायचं आहे की, नारायण राणेच्या पाठी लागू नका, नाहीतर तुमची सगळीच गुपीतं बाहेर काढावी लागतील. मग ते तुम्हाला परवडणार नाही, अशा शब्दांत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी पुन्हा एकदा शिवसेनेला डिवचलं आहे. 

नारायण राणे यांच्या अटक नाट्यानंतर खंडीत झालेली जन आशीर्वाद यात्रा अखेर शुक्रवारी पुन्हा सुरू करण्यात आली आहे. या यात्रेदरम्यान राणे यांनी रत्नागिरीत पत्रकार परिषद घेतली. यावेळी नारायण राणे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेनेचं नाव न घेता म्हणाले, जगाच्या पाठीवर घरात राहून, पिंजऱ्यात राहून कोणी सत्ता चालवलेली मी बघितलं नाही. आज राज्यात कायदा-सुव्यवस्था बिघडली आहे. घरात घुसून बलात्कार होत आहेत, दरोडे पडत आहे. खून, मारामाऱ्या होत आहेत. अभिनेता सुशांतची हत्या झाली, दिशा सॅलियनची बलात्कार करुन हत्या झाली, अजून आरोपी मिळाले नाहीत. पण एका दरोडेखोराला अटक करतात, तसं केंद्रीय मंत्र्याला अटक करायला दोनशे अडीचशे पोलीस, वा काय पराक्रम आहे? मी एवढा क्रिमिनल होतो, तर मला मुख्यमंत्री कसं काय केल? मंत्रीपद कसं काय दिलं?, असा प्रश्न नारायण राणेंनी उपस्थित केला.

महाराष्ट्रातील जनता अनेक समस्यांनी त्रस्त आहे. शेतकऱ्यांना अजूनही कर्जमाफी मिळालेली नाही. पूरस्थिती घ्या, चिपळूण घ्या महाड घ्या, अजून कुणालाही पैसे मिळालेले नाही. नैसर्गिक आपत्तीत मृत पावलेल्यांना द्यायला तुमच्याकडे पैसे नाहीत. कसली भाषणं करता. मी मग सोडणार नाही. आम्हालाही जुन्या गोष्टी माहिती आहेत. रमेश मोरेची हत्या कशी झाली?, जया जाधवाची हत्या कशी झाली?, आपल्याच भावाच्या पत्नीवर अ‍ॅसिड फेकायला कुणी सांगितलं? नारायण राणेच्या पाठी लागू नका, नाहीतर सगळी गुपीतं बाहेर काढावी लागतील, ते परवडणार नाही. 

तुम्हाला जो कायदा तो आम्हालाही आहे. दादागिरी करू नका. आमच्या घरासमोर वरुण देसाई कोणतरी येतो. आमच्या घरावर हल्ला करतो. त्याला अटक नाही. एवढा पोलीस बंदोबस्त असून पोरांनी चोपलं. आता परत आला तर परत जाणार नाहीत. आमच्या घरावर कुणी येईल आम्ही सोडणार नाही, असा इशाराही राणेंनी दिला

मी कोणताही गुन्हा केलेला नाही. मात्र काहीजण सत्तेची मस्ती दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत. आज आम्ही विरोधी पक्षात आहोत. केंद्रात तर सत्तेत आहोतच. भविष्यात आम्ही महाराष्ट्रात देखील सत्तेत येऊ. कोरोनामुळे महाराष्ट्रात १ लाख ५७ हजार लोकांचा मृत्यू झाला आहे. देशात सर्वात जास्त मृत्यू महाराष्ट्रात झाले आहेत. यांच्या सभा राजरोजपणे होत असताना इथं सभा घेऊ नका, तिथे जाऊ नका, ही बंधनं फक्त माझ्यासाठी आहेत. अशी मनाई कोरोना होता तेव्हा का झाली नाही?, असा प्रश्नही नारायण राणेंनी उपस्थित केला.


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा