Advertisement

हिंसक आंदोलन थांबवल्यावरच आरक्षणावर विचार- नारायण राणे

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राणे यांनी नुकतीच मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. या भेटीच्या अनुषंगाने राणे यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेत यासंबंधी माहिती दिली.

हिंसक आंदोलन थांबवल्यावरच आरक्षणावर विचार- नारायण राणे
SHARES

मराठा आरक्षणावरून राज्यात तोडफोड होतेय, जाळपोळ होतेय. त्यामुळं राज्याचंच नुकसान होत आहे. आंदोलकांनी हिंसक आंदोलन थांबवल्यास राज्य सरकार तातडीनं आरक्षण देण्यासंबंधीचा विचार करण्यास तयार असल्याची माहिती महाराष्ट्र स्वाभिमानी पक्षाचे अध्यक्ष खासदार नारायण राणे यांनी दिली.

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राणे यांनी नुकतीच मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. या भेटीच्या अनुषंगाने राणे यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेत यासंबंधी माहिती दिली.


मध्यस्ती करण्याची तयारी

गेल्या १०-१५ दिवसांपासून राज्यभर मराठा आंदोलन हिंसक झालं आहे. सरकार आणि आंदोलकांमध्ये कोणताही संवाद होत नसल्यानं आंदोलन सुरूच आहे. असं असताना आंदोलक आणि सरकार यांच्यातील दुवा म्हणून दोघांमध्ये सुसंवाद घडवण्यासाठी प्रयत्न करत असल्याचं राणे यांनी स्पष्ट केलं. त्यासाठी मराठा नेत्यांसह मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्याचं सांगतानाच मुख्यमंत्र्यांसोबत काय चर्चा झाली हे मात्र राणेंनी गुलदस्त्यातच ठेवणं पसंत केलं.


अहवालावर चर्चा

मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी राणे यांच्या अध्यक्षतेखाली राणे समिती गठीत करण्यात आली होती. या समितीने दिलेल्या अहवालावरूनही मोठा वाद सुरू आहे. राणे समितीचा अहवाल तज्ज्ञ व्यक्तींकडून सर्व आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिक निकष तपासूनच तयार करण्यात आला आहे. त्यामुळं अहवालाबाबत जी काही उलट सुलट चर्चा सुरू आहे, त्यात काहीही तथ्य नसल्याचाही दावा राणे यांनी यावेळी केला. अहवाल पटला नसेल तर सरकारनं तसं प्रतिज्ञापत्र न्यायालयात दाखल करावं, असं आवाहनही त्यांनी सरकारला केलं.


सरकार सक्षम

सरकार आरक्षण देण्यास सक्षम असल्याचा दावा करत राणे यांनी हिंसक आंदोलन त्वरीत थांबवण्याची विनंती आंदोलकांना केली. मुख्यमंत्र्यांसह मराठा नेत्यांचीही आपण भेट घेतली असून पुन्हा मराठा नेत्यांच्या-आंदोलकांच्या मागण्या मुख्यमंत्र्यांसमोर ठेवू. आंदोलकांची इच्छा असल्यास २ दिवसांत त्यांची भेट घडवून आणू, असंही त्यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केलं. त्यामुळं आता राणे यांच्या मध्यस्थीनंतर यातून तोडगा निघतो का आंदोलन शांत होत का हेच पाहणं महत्त्वाचं ठरेल.


राऊत अॅथाॅरिटी नाहीत...

मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटलेला असताना राज्य सरकार, मुख्यमंत्री परिस्थिती हाताळण्यास अपयशी ठरले आहेत. त्यामुळं आता भाजपात मुख्यमंत्री बदलाचे वारे वाहू लागल्याचा दावा नुकताच शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला होता. भाजपाकडून राऊतांच्या दाव्याचं खंडण करण्यात आलं. राणे यांना या दाव्याविषयी विचारलं असता त्यांनी राऊतांना थेट शिंगावरच घेतलं. संजय राऊत ही काय अॅथाॅरीटी नाही, ते जे म्हणतील ते खरं असं मीडियाला वाटतं काय? असं म्हणत राणे यांनी राऊत यांना टोला लगावला.



हेही वाचा-

'मुख्यमंत्र्यांनी आता जनतेपुढंच माफी मागावी'

आर्थिक निकषांवर आरक्षण द्या- राज ठाकरे



Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा