नारायण राणेंची दिल्लीवारी

 Mumbai
नारायण राणेंची दिल्लीवारी

मुंबई - नाराज काँग्रेस नेता नारायण राणे पुढे काय करणार? त्यांची रणनीती काय? या प्रश्नांची उत्तरं लवकरच मिळण्याची शक्यता आहे. राणे नवी दिल्लीत दाखल झाले आहेत. काँग्रेसमध्ये आल्यानंतर राणे यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी किंवा उपाध्यक्ष राहुल गांधी यांची भेट मिळवण्यासाठी नवी दिल्ली गाठल्याची अनेक उदाहरणं आहेत. पण या खेपेस मात्र राणे यांची दिल्लीवारी राजकीय असली तरी ती सोनिया किंवा राहुलभेटीसाठी नाही. कारण दोघंही सध्या परदेशात आहेत. सोमवारी रात्री नवी दिल्लीत दाखल झालेले नारायण राणे तिथल्या एका पंचतारांकित हॉटेलमध्ये वास्तव्यास आहेत.  सोमवारच्या मध्यरात्री किंवा मंगळवारच्या पहाटे ते भाजपाच्या एका ‘वजनदार’ नेत्याची भेट घेण्याची शक्यता आहे. 'राणे काँग्रेस सोडणार' या चर्चेत नारायण राणे यांचे थोरले पुत्र माजी खासदार निलेश राणे यांनी ट्विटरमार्फत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्यावर केलेल्या बोचऱ्या टीकेने वादाचे नवे रंग भरले. त्यानंतर नारायण राणे यांची ही दिल्ली वारी! गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर नारायण राणे पक्षत्याग करून आपल्या राजकीय कारकिर्दीच्या निर्णायक टप्प्यावर वेगळ्या पक्षाची गुढी उभारणार का? राजकीय अभ्यासकांसह सर्वसामान्य नागरिकांचं कुतूहल वाढवणारा हा विषय आहे, हे नक्की.

Loading Comments