Advertisement

नवाब मलिकांवर व्यक्तीगत आराेप नाहीत, शरद पवार यांनी केली पाठराखण

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांची पाठराखण केली.

नवाब मलिकांवर व्यक्तीगत आराेप नाहीत, शरद पवार यांनी केली पाठराखण
SHARES

गेली अनेक वर्ष नवाब मलिक राजकारणात आहेत. पण त्यांच्यावर कधीच व्यक्तीगत आरोप झालेला नाही. त्यांच्या नातेवाईकावर आरोप झालेला आहे, असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (sharad pawar) यांनी राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांची पाठराखण केली. नवाब मलिक यांचे जावई समीर खान यांच्या नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरोने (एनसीबी) ड्रग्ज प्रकरणात अटक केली आहे.

मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलताना शरद पवार यांनी नवाब मलिक (nawab malik) यांच्यावरील आरोपांवरही भाष्य केलं. ते म्हणाले की, नवाब मलिक गेल्या अनेक वर्षांपासून राजकारणात आहेत. पण त्यांच्यावर कधीच व्यक्तीगत आरोप झालेला नाही. शिवाय ते सरकारमधील एक जबाबदार मंत्री देखील आहेत. मलिक यांच्या नातेवाईकावर आरोप झालेला आहे. त्यांच्या जावयाला अटकही झाली असून तपास यंत्रणेला सहकार्य करणं आणि वस्तुस्थिती समोर आणणं गरजेचं आहे. तपास यंत्रणा त्या पद्धतीने काम करेल अशी अपेक्षा आहे. त्यांना संबंधितांकडून सहकार्य होईल याची खात्री आहे. 

हेही वाचा- धनंजय मुंडे यांच्यावर कारवाई निश्चित? शरद पवारांचं सूचक वक्तव्य

राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन नेते एकाच वेळी अडचणीत आल्याने पक्ष प्रमुख म्हणून शरद पवार यांनी या दोन्ही प्रकरणांवर आपलं मत व्यक्त केलं. तर त्याआधी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी देखील नवाब मलिक यांची बाजू घेतली.

नवाब मलिक यांच्या जावयानं काही गुन्हा केला असेल तर त्याची चौकशी झाली पाहिजे. त्यांना कशाच्या आधारे अटक केली आहे हे मला माहीत नाही. चौकशीतून सर्वकाही स्पष्ट होईल व पुढील कारवाई होईल. त्यात राज्य सरकारचा हस्तक्षेप करणार नाही. मात्र, जावयाचं कुटुंब स्वतंत्र असतं. जावयानं काही गुन्हा असेल तर कायद्यानं योग्य ती कारवाई होईल. त्याच्या चुकीची शिक्षा सासऱ्यानं का भोगावी, असा प्रश्न जयंत पाटील (jayant patil) यांनी उपस्थित केला होता.

गेल्या आठवड्यात एनसीबीच्या पथकानं ड्रग्ज तस्करी प्रकरणी खार परिसरातून तिघांना अटक केली होती. त्यात ब्रिटिश नागरिक करण सजनानी व अन्य दोघांचा समावेश होता. त्यांच्या चौकशीतून मुच्छड पानवाला आणि नवाब मलिक यांचे जावई समीर खानं यांचं नाव पुढं आलं होतं. त्यानंतर एनसीबीनं खान यांना चौकशीसाठी समन्स बजावलं होतं. सखोल चौकशीनंतर त्यांना अटक करण्यात आली. शिवाय खान यांच्या वांद्र्यातील घरी एनसीबीने छापा टाकत सर्च ऑपरेशन सुरू केलं आहे.

(ncp chief sharad pawar backs nawab malik in drugs case)

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement