Advertisement

राज्यपालांकडे कंगनाला भेटायला वेळ, पण…; शरद पवार संतापले

राज्यपालांना कंगनाला भेटायला वेळ आहे. पण माझ्या शेतकऱ्यांना भेटायला वेळ नाही, असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याबद्दल संताप व्यक्त केला.

राज्यपालांकडे कंगनाला भेटायला वेळ, पण…; शरद पवार संतापले
SHARES

राज्यपालांना कंगनाला भेटायला वेळ आहे. पण माझ्या शेतकऱ्यांना भेटायला वेळ नाही. महाराष्ट्राच्या इतिहासात असले राज्यपाल लाभले नाहीत, असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याबद्दल संताप व्यक्त केला. ते 'संयुक्त शेतकरी कामगार मोर्चा'च्या व्यासपीठावर बोलत होते.

केंद्र सरकारच्या नव्या कृषी कायद्यांविरोधात दिल्लीच्या सीमेवर जवळपास २ महिन्यांपासून शेतकरी संघटना आंदोलन करत आहे. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी संयुक्त शेतकरी-कामगार मोर्चाच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रातील शेतकरी देखील एकवटले आहेत. सोमवारी मुंबईतील आझाद मैदानात राज्यातील कानाकोपऱ्यातील शेतकरी हजारोंच्या संख्येने आंदोलनासाठी मुंबईत (mumbai) दाखल झाले आहेत. या आंदोलनात सहभागी होत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शेतकऱ्यांना पाठिंबा दिला.

यावेळी बाेलताना शरद पवार म्हणाले, देशाच्या स्वातंत्र्यसंग्रामात मुंबईने आक्रमकपणाची भूमिका घेतली होती, संयुक्त महाराष्ट्राच्या मागणीसाठी मुंबईतील कष्टकरी वर्ग रस्त्यावर उतरला होता, यावेळेस महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून शेतकरी दिल्लीतील आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मुंबईला आले आहेत. या आंदोलनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी जे प्रचंड कष्ट आणि त्याग केले आहेत, त्याबद्दल सर्वांचेच आभार मानावे तेवढे कमी आहेत. 

हेही वाचा- मुंबई काँग्रेसला राखायचंय विरोधीपक्ष नेतेपद!

शरद पवार (sharad pawar) पुढं म्हणाले, तुम्ही राज्यपालांना निवेदन द्यायला निघाला आहात. पण महाराष्ट्राच्या इतिहासात असले राज्यपाल लाभले नाहीत. राज्यपाल गोव्याला निघून गेलेत. राज्यपालांना कंगनाला भेटायला वेळ आहे. पण माझ्या शेतकऱ्यांना भेटायला वेळ नाही. राज्यपालांची ही नैतिक जबाबदारी होती. राज्यातला कष्टकरी, अन्नदाता त्यांना निवेदन देण्यासाठी येणार होता त्याला सामोरं येणं अपेक्षित होतं. पण त्यांच्याकडे सभ्यता नाही. निदान राजभवनात तरी बसायला हवं होतं. पण ते थांबले नाहीत, असं म्हणत राज्यपालांवर तोफ डागली.

ही लढाई सोपी नाही. कारण, ज्यांच्या हातात सत्ता आहे त्यांना देशातील कष्टकऱ्यांबद्दल व शेतकऱ्यांबद्दल कवडीची आस्था नाही. आपण पाहत आहात, ६० दिवस झाले उन्हातान्हात थंडी वाऱ्याचा विचार न करता शेतकरी आंदोलन करत आहेत. देशाच्या पंतप्रधानांनी कधी त्यांची चौकशी केली का? असा प्रश्न देखील शरद पवार यांनी उपस्थित केला.

तसंच जो शेतकऱ्यांचं जीवन उध्वस्त करतो, त्याला समाजकारणातून उध्वस्त करण्याची ताकद आमच्या आहे, हे तुम्ही आज या ठिकाणी दाखवून दिलं आहे, असं म्हणत शेतकऱ्यांचे आभारही त्यांनी मानले.

यावेळी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात (balasaheb thorat), शेकापचे नेते जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड, सुनील केदार, भाकपचे नेते कॉम्रेड नरसय्या आडाम, मुंबई काँग्रेस अध्यक्ष भाई जगताप, अबू आझमी यांच्यासह महाविकासआघाडी व शेतकरी संघटनांचे नेते उपस्थित होते.

(ncp chief sharad pawar slams maharashtra governor bhagat singh koshyari in farmers rally)

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा