सोशल मीडियातून भूमिका मांडत सातत्यानं चर्चेत असलेले प्रसिद्ध दिग्दर्शक अनुराग कश्यप आणि अभिनेत्री तापसी पन्नू यांच्या मुंबईतील मालमत्तावर धाडी टाकत प्राप्तिकर विभागाने झाडाझडती सुरू केली आहे. त्यावर प्रतिक्रिया देताना केंद्र सरकारविरोधात भूमिका मांडणाऱ्यांवरच छापे टाकण्यात येतात, असा आरोप राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक (nawab malik) यांनी केला आहे.
प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना नवाब मलिक म्हणाले, सिनेकलाकार अनुराग कश्यप आणि तापसी पन्नू यांच्या घरी आणि त्यांच्या कार्यालयावर प्राप्तिकर विभागाने छापे टाकले आहेत. जे लोक केंद्र सरकारच्या विरोधात भूमिका मांडतात वा सरकार धोरणांविरोधात आवाज उठवतात त्यांच्यावर ईडी, सीबीआय, आयकर विभाग छापे टाकण्यात येतात, असं मागील काळात वारंवार दिसून आलं आहे.
गेल्या काही दिवसांपासून अनुराग कश्यप आणि तापसी पन्नू हे केंद्रातील मोदी सरकारच्या कामाबाबत टिप्पणी करत होते. त्यांचा आवाज दाबण्यासाठी याप्रकारची कारवाई करण्यात आली आहे. कुठेतरी लोकांच्या मनात भीती निर्माण करण्याचा, त्यांच्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न केंद्र सरकार करतंय, असा आरोप नवाब मलिक यांनी केला.
हेही वाचा- अनुराग कश्यप, तापसी पन्नू यांच्या मुंबईतील मालमत्तांवर आयकरचे छापे
सिनेकलाकार @anuragkashyap72, @taapsee यांच्या घरी आणि त्यांच्या कार्यालयावर आयकर विभागाने छापे टाकले आहेत. जे लोक केंद्र सरकारच्या विरोधात भूमिका मांडतात वा सरकार विरोधात आवाज उठवतात त्यांच्यावर ईडी, सीबीआय, आयकर विभाग छापे टाकते असे वारंवार दिसून आले आहे - ना. @nawabmalikncp pic.twitter.com/AIfbaEilGf
— NCP (@NCPspeaks) March 3, 2021
अनुराग कश्यप आणि अभिनेत्री तापसी पन्नू यांच्या मुंबईतील मालमत्तांवर बुधवारी प्राप्तिकर विभागाने छापे टाकले. अनुराग आणि तापसी यांच्याबरोबरच विकास बहल आणि मधू मंटेना यांच्या घरीही प्राप्तिकर विभागाने छापे टाकले आहेत. कर चुकवल्याच्या आरोपाखाली हे छापे टाकण्यात आले आहेत.
प्राप्तिकर विभागाने बुधवारी दुपारी फँटम प्राॅडक्शन हाऊसशी संबंधित अनुराग कश्यप, तापसी पन्नू, विकास बहल आणि मधू मंटेना यांच्या मालमत्तावर धाडी टाकल्या. मधू मंटेना यांची कंपनी ‘क्वान’ यांच्या कार्यालयावरही छापा टाकण्यात आला. मुंबईतील २२ ठिकाणांची झाडाझडती प्राप्तिकर विभागाकडून घेतली जात आहे.
कर चोरी केल्याप्रकरणी फँटम फिल्म आणि क्वान या कंपन्यांशी संबंधित असलेल्यांवर कारवाई करण्यात आल्याचं प्राप्तिकर विभागानं म्हटलं आहे. फँटम फिल्म्स चित्रपट निर्मिती आणि त्याचं वितरण करण्याचं काम करते. अनुराग कश्यप, दिग्दर्शक विक्रमादित्य मोटवानी, निर्माता मधू मंटेना आणि विकास बहल यांनी ही कंपनी २०११ मध्ये सुरू केली होती. सहसंस्थापक विकास बहलवर लैंगिक शोषणाचा आरोप झाल्यानंतर कंपनी २०१८ मध्ये बंद करण्यात आली होती.
(ncp leader nawab malik reacts on IT department raid on anurag kashyap and taapsee pannu)