Advertisement

राज ठाकरे अज्ञानातून ‘असं’ बोलले असावेत, राष्ट्रवादीचा पलटवार

राज ठाकरे यांना हे माहीत नसावं किंवा जातीव्यवस्थेचा इतिहास त्यांना माहीत नसावा म्हणून ते अशा प्रकारचं वक्तव्य करत आहे.

राज ठाकरे अज्ञानातून ‘असं’ बोलले असावेत, राष्ट्रवादीचा पलटवार
SHARES

महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेसच्या जन्मानंतरच जातीचा मुद्दा हा सर्वार्थाने मोठा झाला. जेम्स लेनला मराठा तरुण-तरुणींपर्यंत कुणी पोहोचवलं?, असा प्रश्न उपस्थित करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर थेट आरोप केला होता. या आरोपाला राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी सडेतोड उत्तर दिलं आहे. 

यासंदर्भात एबीपी माझा वृत्तवाहिनीशी बोलताना नवाब मलिक (nawab malik) म्हणाले, 'राष्ट्रवादी काँग्रेस हा शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारांवर चालणारा पक्ष आहे. त्यांच्या ठरलेल्या धोरणानुसार आम्ही राजकारण करतो. राज ठाकरे यांना हे माहीत नसावं किंवा जातीव्यवस्थेचा इतिहास त्यांना माहीत नसावा म्हणून ते अशा प्रकारचं वक्तव्य करत आहे. 

या देशात मनुवादी व्यवस्थेमुळं वर्णव्यवस्था निर्माण झाली आणि त्या अंतर्गत जातीव्यवस्था उभ्या राहिल्या. त्यातून जातीचा आधार घेत अनेक वर्षे लोकांवर अन्याय होत राहिला, हे राज ठाकरे यांना बहुतेक माहीत नसावं. छत्रपती शाहू महाराज, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महामानवांनी जातीव्यवस्था नष्ट करण्याचं काम केलं. समता मूलक समाज घडवण्याचं काम केलं हेही राज ठाकरे यांना माहीत नसावं. त्या अज्ञानातून राज ठाकरे यांनी हे वक्तव्य केलं असावं, असं प्रत्युत्तर नवाब मलिक यांनी दिलं.

हेही वाचा- ‘या’ पक्षाच्या जन्मानंतर महाराष्ट्रात दुसऱ्यांच्या जातीबद्दलचा द्वेष वाढला- राज ठाकरे

दरम्यान, एबीपी माझा वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात बोलताना राज ठाकरे (raj thackeray) यांनी महाराष्ट्रातील राजकारणावर परखडपणे भाष्य केलं. ते म्हणाले, महाराष्ट्रात जाती आधीपासून होत्याच. प्रत्येकाला आपल्या जातीबद्दल अभिमान होता. जातीवर आजही मतदान होतं. मात्र सध्या महाराष्ट्राच दुसऱ्याच्या जातीबद्दलचा द्वेष वाढत चालला आहे. दुसऱ्याच्या जातीबद्दल द्वेष वाटणं आणि त्याबद्दल आरडाओरडा करणं याआधी महाराष्ट्रात होतं नव्हतं. हे गेल्या २०-२५ वर्षांपासून सुरु झालं. हे महाराष्ट्राच्या सांस्कृतिक चेहऱ्याला डाग लावणारं आहे. 

महाराष्ट्रात मराठी बोलणारे लोकं जसी आपली भाषिक आणि प्रादेशिक अस्मिता जपून आहेत, तशीच तामिळ, गुजराती, बंगाली बोलणारे लोकं आपापल्या राज्यात अस्मिता बाळगून आहेत. भाषा आणि त्यातून निर्माण होणारी संस्कृती देश निर्माण होण्याच्याही आधीपासूनच आहेत, हे आपण आधी लक्षात घेतलं पाहिजे. एखादी भाषा आणि संस्कृती दुसऱ्यांवर लादण्यासाठी दुसऱ्या भाषेला किंवा लोकांना कमजोर करणं योग्य नाही. किती वर्ष उत्तर आणि दक्षिणेत सुरु असलेला संघर्ष आपण पाहिला आहे. पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण असा भारत आजपर्यंत आपण पाहत आलो असून त्यातूनच या गोष्टी बिघडल्या आहेत, यावर राज ठाकरे यांनी बोट ठेवलं हाेतं.


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा