Advertisement

दलित मतांचा आधार की...

गेल्या २ दिवसांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हालचालींवरून राष्ट्रवादीची येत्या काळातील स्ट्रॅटर्जी काय असेल, याची झलक मिळाली.

दलित मतांचा आधार की...
SHARES

महाविकास आघाडी सरकारचं खातेवाटप रखडलेलं असलं, तरी राष्ट्रवादी काँग्रेस नवीन वर्षाच्या सुरूवातीपासूनच कामाला लागल्याचं दिसत आहे. खासकरून गेल्या २ दिवसांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हालचालींवरून राष्ट्रवादीची येत्या काळातील स्ट्रॅटर्जी काय असेल, याची झलक मिळाली.

अजित पवार यांनी १ जानेवारीला कोरेगाव भीमा इथं जाऊन विजयस्तंभाला अभिवादन केलं. तर दुसऱ्याच दिवशी त्यांनी दादरच्या चैत्यभूमीला भेट दिली आणि पाठोपाठ इंदू मिलमधील डाॅ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या कामाचा आढावा घेतला. या भेटीगाठीनंतर दुरावलेल्या दलित मतदारांना पक्षाकडे पुन्हा वळवण्यासाठी नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवसापासून राष्ट्रवादीने प्रयत्न सुरू केल्याची चर्चा प्रसार माध्यमांमध्ये रंगली. वरकरणी ही साधी भेट वाटत असली, तरी त्यामागे राष्ट्रवादीची निश्चित स्ट्रॅटर्जी असल्याचं राजकीय जाणकारांचं म्हणणं आहे.

पक्षाच्या स्थापनेपासूनच मराठा मतदार राष्ट्रवादीच्या हक्काचा मतदार राहिला आहे. सहकार क्षेत्र आणि त्या भोवती फिरणारं राजकारण, प्रस्थापित राजकीय घराण्यांची माळ गुंफून राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मोठ्या ताकदीने पक्ष उभा केला. निष्ठावान कार्यकर्ते, जोडीला आर्थिक शक्तीच्या जोरावर पक्ष ग्रामीण महाराष्ट्रात चांगलाच वाढला. निवडणुकीच्या काळात काँग्रेससोबत जुळवून घेताना राष्ट्रवादीने त्यांच्या पारंपरिक मतदारांनाही आपलंस केलं. परिणामी राष्ट्रवादीच्या जनाधारात आणखीनच भर पडली. त्याचे सकारात्मक परिणाम पुढील निवडणुकांमध्ये दिसून आले. 

परंतु २०१४ पाठोपाठ २०१९ च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत मराठा आणि दलित, अल्पसंख्यांक समाजातील मतदारांनी राष्ट्रवादीकडे पाठ फिरवल्याने राष्ट्रवादीच्या मतटक्क्यात घट झाली. एका बाजूला राष्ट्रवादीची ताकद असलेले नेते पक्ष सोडून जात असताना मतदारांनीही पक्षापासून फारकत घेतली. या उलट मागील ५ ते ६ वर्षांत मराठा समाजाच्या मागण्या, छत्रपती शिवाजी महाराज, डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचं भूमिपूजन अशा अनेक विषयांना हात घालत भाजपने काँग्रेस-राष्ट्रवादीपासून तुटलेल्या मतदारांना आपलंस केलं. मधल्या काळात अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी वंचित बहुजन आघाडीची स्थापना करून उरल्यासुरलेल्या वंचितांची मोट बांधण्याचा प्रयत्न केला. याचा मोठा फटका दोन्ही पक्षांना बसला.

२०१४ च्या लोकसभा, विधानसभा आणि २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत ग्रामीण भागातील मराठा आणि दलित मतदारांपैकी ५५ टक्क्यांहून अधिक मतदारांनी भाजप-शिवसेनेला मतदान केलं होतं. तर काँग्रेस-राष्ट्रवादीच्या वाट्याला ३० टक्क्यांहून कमी- अधिक मतंच आली होती. कारण मधली मतं वंचितच्या खात्यात जमा झाली होती. परंतु २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत अनेक मुद्द्यावरून या मतदारांनी भाजपला मतदान करण्याचं टाळलं. यामागे जातीय समिकरणापेक्षा अस्मितेचा मुद्दा अधिक प्रभावी ठरला. 

आर्थिक मंदीमुळे सर्वसामान्यांमध्ये नाराजी होती, तरूणांमध्ये बेकारीची समस्या वाढत असल्याने त्यांच्यातही संतापाची लाट उसळत होती. शेतकऱ्यांचे प्रश्न प्रलंबित होते. राष्ट्रीयत्वाच्या मुद्द्यावरून अल्पसंख्याकांमध्ये अस्वस्थता होती. त्यातच भाजपकडून शरद पवार यांना लक्ष्य करण्यात आल्याने त्यांच्याबद्दल मतदारांमध्ये सहानुभूती निर्माण झाली. या सर्व ताज्या मुद्द्यांना हाताशी धरून राष्ट्रवादीने सन्मानकारक जागा मिळवल्या आणि शिवसेना, काँग्रेससोबत मिळून सत्ताही स्थापन केली.

परंतु सत्तेत जाऊन बसल्याने सर्वकाही आलबेल झालं अशी पक्षाची स्थिती नक्कीच नाही. विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीने ५४ जागा मिळवल्या खऱ्या; परंतु मतांची टक्केवारी १६.७ टक्क्यांपर्यंत घसरली आहे. वंचितमुळे राष्ट्रवादीचं किमान ३५ जागांवर नुकसान झाल्याचं म्हटलं जात आहे. यांत तथ्य असो किंवा नसो, पण पुढच्या निवडणुकांमध्ये ताकदीने लढत द्यायची असल्यास राष्ट्रवादीला मराठा मतदारांसोबतच दलित, अल्पसंख्यांक मतदारांच्या आधाराची गरज भासणार आहे.  


हे ध्यानात घेत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी बैठक घेऊन पक्षातील नेत्यांना दलित मतदारांसोबत ग्रामीण भागातील मतदारांकडे विशेष लक्ष ठेवण्याच्या सूचना केल्या. त्यामुळे की काय अजित पवार यांनी प्रकाश आंबेडकर आणि रामदास आठवले यांच्या आधी जाऊन सकाळी ७ वाजताच कोरेगाव भीमा येथील विजयस्तंभाला अभिवादन केलं आणि पाठोपाठ डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाच्या कामासाठी आवश्यक सर्व परवानग्या महिन्याभरात देतानाच या कामासाठी एकही पैसा कमी पडू देणार नाही, अशी घोषणा पत्रकार परिषदेच्या माध्यमातून केली. 

या जोडीलाच राष्ट्रवादीने ग्रामविकास, सहकार आणि पणन तसंच सामाजिक न्याय विभाग स्वत:कडेच ठेवण्यासाठी जोर लावला आहे. या माध्यमातून येत्या काळात ग्रामीण भागातील मतदारांसोबतच अल्पसंख्याक समाजातील मतदारांना आपल्याकडे वळवण्याचा राष्ट्रवादीचा प्रयत्न असणार आहे, हे निश्चित. 

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा