Advertisement

घरात सापडले पाकिस्तानी क्रेडिट कार्ड? प्रताप सरनाईक म्हणाले...

ज्या पाकिस्तानचं जगात क्रेडिट नाही त्यांचं क्रेडिट कार्ड घेऊन मी काय करु? असा प्रश्न शिवसेना आमदार आणि प्रवक्ते प्रताप सरनाईक यांनी उपस्थित केला आहे.

घरात सापडले पाकिस्तानी क्रेडिट कार्ड? प्रताप सरनाईक म्हणाले...
SHARES

माझ्या घरात पाकिस्तानी क्रेडिट कार्ड मिळालं, राफेलची कागदपत्रं मिळाली, ट्रम्प यांच्यासोबत भागीदारी असल्याची कागदपत्रं मिळाली अशा प्रकारच्या खोट्या बातम्या प्रसिद्ध करुन माझी आणि कुटुंबीयांची बदनामी करणारी अभिनेत्री कंगना रणौत आणि मीडियाविरोधात मी हक्कभंग प्रस्ताव दाखल केला आहे. ज्या पाकिस्तानचं जगात क्रेडिट नाही त्यांचं क्रेडिट कार्ड घेऊन मी काय करु? असा प्रश्न शिवसेना आमदार आणि प्रवक्ते प्रताप सरनाईक यांनी उपस्थित केला आहे.

राज्याचं दोन दिवसीय हिवाळी अधिवेशन सुरु असताना प्रसारमाध्यमांशी बोलताना आपल्या घरी पाकिस्तानी क्रेडिट कार्ड सापडल्याचा दावा प्रताप सरनाईक यांनी फेटाळून लावला. यासंदर्भात अधिक माहिती देताना सरनाईक म्हणाले, माझ्या घरी आणि कार्यालयात ईडीच्या अधिकाऱ्यांनी एका प्रकरणांतर्गत छापेमारी केली. त्यानंतर अभिनेत्री कंगना रणौतने मुंबईत आल्यानंतर तोंड फोडण्याची गोष्ट करणाऱ्यांच्या घरी पाकिस्तानी क्रेडिट कार्ड सापडलं अशा आशयाचं खोटं ट्विट करत माझी बदनामी केली. मुळात या छापेमारीत ईडीच्या कोणत्याही अधिकाऱ्याने माझ्या घरी काय सापडलं याची माहिती दिलेली नाही.

हेही वाचा- प्रताप सरनाईक हाजीर हो...! ईडीकडून पुन्हा बोलावणं

त्यानंतर कंगनाच्या ट्विटच्या आधारे प्रसारमाध्यमांनी माझ्याविरोधात बातम्या केल्या. हा प्रकार म्हणजे ईडीच्या माध्यमातून माझी आणि कुटुंबीयांची संपूर्ण देशभरात बदनामी करण्याचा प्रयत्न असल्याचा दावा प्रताप सरनाईक यांनी केला. म्हणूनच खोटं ट्विट करणारी कंगना रणौत आणि कुठलीही शहानिशा न करता बातम्या करणारे इलेक्ट्रॉनिक, प्रिंट आणि सोशल मीडिया यांच्याविरोधात मी हक्कभंग दाखल केला आहे. हा हक्कभंग प्रस्ताव मान्य करावा अशी विनंती मी अध्यक्षांना केली आहे, अशी माहितीही प्रताप सरनाईक यांनी दिली.

गेल्या काही दिवसांपासून माझ्या मागे ईडीच्या चौकशीचा ससेमिरा लावण्यात आलेला आहे. या चौकशीत मी आणि माझं कुटुंबिय ईडीला पूर्णपणे सहकार्य करत आहोत. ईडीच्या अधिकाऱ्यांच्या सगळ्या प्रश्नांची मी उत्तर दिली आहेत आणि भविष्यातही देत राहीन. ईडीला जेव्हा चौकशीची गरज असेल, कुठल्याही शंका असतील, त्याचं निरसन करण्यासाठी मी २ तासात हजर राहीन, असं मी ईडीच्या अधिकाऱ्यांना सांगितलं आहे, असंही प्रताप सरनाईक यांनी सांगितलं.

दरम्यान, ईडीने प्रताप सरनाईक यांना १३ तारखेपासून ते २१ डिसेंबरपर्यंत चौकशीला राहण्याचे आदेश दिले आहे. या पूर्वी ईडीने सरनाईक यांना चौकशीला बोलावलं होतं. त्यावेळी ३ समन्स बजावूनही सरनाईक हे चौकशीला हजर झाले नव्हते. त्यामुळे आता ते ईडीच्या चौकशीला वेळेत येतात का हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.  

(no pakistani credit card found at my home in ed raid says shiv sena mla pratap sarnaik)

हेही वाचा- शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांची ७ तास चौकशी

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा