मुंबई महापालिकेत महिलाराज

  Mumbai
  मुंबई महापालिकेत महिलाराज
  मुंबई  -  

  मुंबई - महपालिकेच्या निवडणुकीत आरक्षणानुसार निम्म्या जागा महिलांसाठी राखीव ठेवण्यात आल्या असल्या तरी प्रत्यक्षात त्याहून अधिक महिला विजय मिळवत नगरसेविका म्हणून निवडून आल्या आहेत. यावेळी महापालिकेत तब्बल १२३ महिला निवडून आल्या आहेत. त्यामुळे महापालिकेत महिला राज पाहायला मिळणार आहे.

  मुंबई महापालिकेत एकूण २२७ नगरसेवक संख्या असून, त्यातील ११४ प्रभाग हे महिलांसाठी आरक्षित आहे. परंतु यावेळी निम्म्यापेक्षा अधिक म्हणजे १२३ जागांवर महिला निवडून आल्या असून, यापैकी केवळ दहा ते पंधरा टक्के एवढ्या नगरसेविकाच आजी आणि माजी नगरसेविका आहेत. उर्वरित सर्व नगरसेविका या नवोदीत आणि अननुभवी नगरसेविका आहेत. यापूर्वीच्या निवडणुकीत निवडून आलेल्या महापालिका सभागृहातील विद्यमान महिला नगरसेवकांची संख्याही ११९ आहे. यासर्व विद्यमान नगरसेवकांची संख्या ८ मार्च रोजी संपुष्टात येत आहे. त्यामुळे नंतर निवडून आलेल्या नवीन नगरसेवकांच्या हाती महापालिकेचा कारभार असेल. या नवीन महापालिका सभागृहात वाढलेल्या महिला नगरसेवकांचा वाढलेला टक्का पाहायला मिळणार आहे. मागील निवडणुकीत निवडून आलेल्या नगरसेविकांमध्ये शीतल म्हात्रे, अजंता यादव, गीता यादव, डॉ. सईदा खान, श्रद्धा जाधव, यामिनी जाधव, समिता कांबळे, ज्योती अळवणी, स्नेहा झगडे, अनिषा माजगावकर, समिता नाईक, वैष्ण्वी सरफरे, प्रियंका श्रुंगारे, गीता चव्हाण, नेहा पाटील आदी नगरसेविकांनी आपल्या वेगळी छाप निर्माण केली होती. यापैकी काही विद्यमान नगरसेविका या पुन्हा निवडून आल्या आहेत. त्यामुळे या नगरसेविकांच्या अनुभवाचा फायदा निश्चितच या नव्याने निवडून आलेल्या नगरसेविकांना होणार आहे. डॉ. शुभा राऊळ यांच्यासह अनेक नगरसेविकांनी ही निवडणूक लढवलीच नाही. परंतु अनेक निवडणूक लढवणाऱ्यांपैकी तृष्णा विश्वासराव, डॉ. अनुराधा पेडणेकर, शीतल म्हात्रे यांच्यासह सभागृहातील हुशार व अभ्यासू नगरसेविकांना पराभव पत्करावा लागला आहे. त्यामुळे सभागृहातील आवाजही आता कमी होणार आहे. परंतु या वाढलेल्या महिलांच्या टक्केवारीमुळे सभागृहातील आवाज वाढलेला पाहायला मिळाला तरी त्या आवाजात “दम” असेल का हा प्रश्न आहे. त्यामुळे आता सभागृहातील वाढलेल्या महिला नगरसेवकांपैकी कोणत्या नगरसेविकेला आपली छाप महापालिकेवर उमटवता येते हे येत्या काही वर्षात स्पष्ट होईल.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.