माजी नगरसेवकांच्या उमेदवारी निवडीकडे लक्ष

 Pali Hill
माजी नगरसेवकांच्या उमेदवारी निवडीकडे लक्ष
Pali Hill, Mumbai  -  

मुंबई - मागील महापालिका निवडणुकीत आरक्षणामुळे अनेक मातब्बर नगरसेवकांचे पत्ते कापले गेले. तर काहींवर पराभवामुळे घरी बसण्याची वेळ आली होती. परंतु आता नव्या प्रभाग आरक्षणामुळे अनेक माजी नगरसेवकांचे प्रभाग खुले झाले असून, पुन्हा एकदा महापालिकेत प्रवेश करण्यासाठी त्यांची धावपळ सुरु झाली आहे. त्यामुळे युती तसेच आघाडी या त्रांगड्यात अडकलेल्या या पक्षांच्या सर्वच नगरसेवकांचे लक्ष आता उमेदवारीकडे लागले आहे.

सन 2007 च्या सार्वत्रिक निवडणुकीत प्रभाग आरक्षित झाल्यामुळे शिवसेनेचे माजी नगरसेवक मंगेश सातमकर, प्रभाकर शिंदे, विश्वनाथ महाडेश्वर, सुभाष कांता सावंत, राजूल पटेल, बनसोडे, शशिकांत पाटकर, मिलिंद वैद्य, अरविंद बने, काँग्रेसचे उपेंद्र दोषी, रवी राजा, राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित रावराणे, भाजपाचे भालचंद्र शिरसाट, जनक संघवी, शरद पेटीवाला, अरविंद परमार, सीताराम तिवारी, मीनल जुवाटकर आदींचे प्रभाग खुले झाले असल्यामुळे त्यांचा महापालिकेत प्रवेश करण्याचा मार्ग खुला झाला आहे. परंतु विद्यमान नगरसेवकांनीही आपली दावेदारी सांगितल्यामुळे आजी विरुद्ध माजी नगरसेवकांमध्ये चुरस लागली आहे. युती किंवा आघाडी न झाल्यास स्वतंत्र निवडणूक लढली जाईल आणि सर्वच आजी माजी नगरसेवकांची वर्णी लावली जाणार आहे. परंतु युती किंवा आघाडी झाल्यास कुणा एका आजी- माजी नगसेवकाला घरी बसावे लागणार आहे.

माजी आमदारही पुन्हा नगसेवकपदासाठी इच्छुक

माजी नगरसेवक निवडणूक रिंगणात उतरण्यासाठी इच्छुक असतानाच माजी आमदारही पुन्हा नगरसेवक बनण्यासाठी आग्रही आहे. प्रभाग 191 मधून माजी महापौर आणि माजी आमदार विशाखा राऊत यांचे नाव जोरदार चर्चेत आहे. त्यांच्या बरोबरच काँग्रेसचे माजी आमदार राजहंस सिंह हे सुद्धा आपल्या जुन्या कुर्ला किंवा मालाड दिंडोशी मतदार संघातून निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत. मात्र राजहंस सिंह हे आपले चिरंजीव नितेश सिंह यांना कुर्ल्यातून उमेदवारी मिळवून देण्याचा प्रयत्न करत आहेत. राजहंस सिंह यांच्याशी संपर्क साधला असता याबाबत त्यांनी सकारात्मकता दर्शवली. योग्य वेळी पक्षाच्या आवश्यकतेनुसार निर्णय घेणार असल्याचं सिंह यांनी सांगितलं.

Loading Comments