Advertisement

गंभीर कोरोनाग्रस्त रुग्णांनाच मिळावा हाॅस्पिटल बेड- महापौर

गंभीर आणि तातडीने उपचारांची गरज असलेल्या कोरोनाबाधितांनाच रुग्णालयात खाट मिळाली पाहिजे. जेणेकरून तातडीने वैद्यकीय उपचारांची गरज असलेल्या व्यक्तीला उपचार मिळू शकतील, असं किशोरी पेडणेकर म्हणाल्या.

गंभीर कोरोनाग्रस्त रुग्णांनाच मिळावा हाॅस्पिटल बेड- महापौर
SHARES

महाराष्‍ट्रात कोरोना विषाणूने (Coronavirus) कहर केलेला असताना मुंबईतील स्थितीही बिकट होत चालली आहे. रोजच्या रोज कोरोनाबाधितांच्या संख्येमध्ये वाढ होत आहे. अशा स्थितीत केवळं गंभीर स्वरूपाच्या कोरोनाबाधित रुग्णांनाच रुग्णालयातील बेड मिळावा, असं वक्तव्य मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी केलं आहे. 

मुंबईतील स्थिती गंभीर

महाराष्ट्रात सध्याच्या स्थितीत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ८२,९६८ वर जाऊन पोहोचली असून त्यातील ३७,३९० रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आलं आहे. तर ४२,६०० रुग्णांवर उपचार सुरू आहेत. शिवाय २९६९ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू देखील झाला आहे. मुंबईतील कोरोनाबाधित रुग्णांची संख्याही ५० हजारांकडे (४७,३५४) वाटचाल करत असून १९,९७७ रुग्ण बरे झाले आहेत. तर २५,७९४ कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तसंच आतापर्यंत १५७७ रुग्णांचा मृत्यूही झाला आहे.

हेही वाचा- मुंबईत हॉटस्पॉटमध्ये कोरोना रुग्ण वाढीचा दर घटला

उपचारांसाठी भटकंती

एकाबाजूला रुग्णांची संख्या वाढत असताना सरकारी रुग्णालयांवरील ताणही वाढतच चालला आहे. बहुतेक ठिकाणी खाटा उपलब्ध नसल्याने कोरोनाबाधित रुग्णांना उपचारांसाठी इकडून तिकडं भटकावं लागत आहे. रुग्णालयांतील दुर्दशा दाखवणारे अनेक व्हिडिओ देखील व्हायरल होत आहेत. खाटांच्या उपलब्धतेवरून विरोधकांकडून सातत्याने सरकारला लक्ष्य केलं जात आहे. या सगळ्या परिस्थितीवर महापौरांनी भाष्य केलं आहे. 

आरोग्य यंत्रणांवर ताण

मुंबई महापालिकेच्या महापौर किशोरी पेडणेकर म्हणाल्या की, मुंबईतील आरोग्य यंत्रणांवर प्रचंड ताण आहे. कोरोनाबाधित रुग्णावर उपचार करण्यासाठी डाॅक्टर, नर्स, आरोग्य कर्मचारी असे प्रत्येकजण दिवसरात्र मेहनत घेत आहेत. तरीही कोरोनाबाधितांच्या संख्येपुढं ही यंत्रणा अपुरी ठरत आहे. याचं कारण कोरोना टेस्ट पाॅझिटिव्ह आल्यानंतर आपल्याला लगेच रुग्णालयातील खाट उपलब्ध व्हावी, असं कोरोनाबाधित रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना वाटतं. 

परंतु तसं होऊ शकत नाही. सगळ्यांनाच खाटा उपलब्ध करून देणं तांत्रिकदृष्ट्या शक्य देखील नाही. त्यामुळे गंभीर आणि तातडीने उपचारांची गरज असलेल्या कोरोनाबाधितांनाच रुग्णालयात खाट मिळाली पाहिजे. जेणेकरून तातडीने वैद्यकीय उपचारांची गरज असलेल्या व्यक्तीला उपचार मिळू शकतील, असं किशोरी पेडणेकर म्हणाल्या.

विरोधकांचा आरोप

विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजप नेते किरीट सोमय्या सातत्याने मुंबईत उपलब्ध खाटांच्या समस्येकडे लक्ष वेधत आहेत. खासगी किंवा सरकारी रुग्णालयात कोरोनाग्रस्तांना खाट उपलब्ध होत नसल्याचं त्यांचं म्हणणं आहे. त्यामुळे कुठल्या रुग्णालयात किती उपलब्ध खाटा आहेत. याची माहिती सर्वसामान्यांना देण्यासाठी आॅनलाइन डॅशबोर्ड सुविधा सुरू करावी, अशी मागणीही फडणवीस यांनी अनेकदा केली आहे.   

हेही वाचा- राज्यात २७३९ नवे रुग्ण, पहा तुमच्या जिल्ह्यात किती रुग्ण आहेत?

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा