पालघर (palghar) विधानसभा मतदारसंघात महायुतीचे शिवसेना (shiv sena) शिंदे गटाचे उमेदवार राजेंद्र गावित (rajendra gavit) यांच्या प्रचार रॅलीला (rally) स्थानिक ग्रामस्थांनी विरोध केला. सातपाटी व मुरबे येथे रॅलीच्या दरम्यान मोठ्या प्रमाणात निषेधाचा सूर उमटल्याचे दिसून आले.
केंद्र सरकारने वाढवण आणि मुरबे या भागात प्रस्तावित बंदर उभारणी प्रकल्पाला गती दिली आहे. याविरोधात पश्चिम किनारपट्टीवरील गावकरी आक्रमक झाले आहेत. मुरबे येथे प्रस्तावित बंदराच्या विरोधात ग्रामस्थांनी काळे झेंडे (black flags) दाखवले तर ग्रामपंचायतीच्या वतीने बंदराच्या विरोधात निवेदन देण्यात आले.
स्थानिकांनी वाढवण व मुरबे येथील प्रस्तावित बंदराच्या विरोधात राजेंद्र गावित यांची मुरबे गावात प्रचार रॅली सुरू असताना ग्रामस्थांनी काळे झेंडे दाखवत रॅली रोखली. यावेळी राजेंद्र गावित यांनी खासदार असताना या प्रकल्पाच्या विरोधात ठोस भूमिका घेतली नाही म्हणून गावित यांच्यासह महायुतीच्या धोरणांचा निषेध करण्यात आला.
ग्रामपंचायतच्या सरपंच मोनालिसा तरे, उपसरपंच राकेश तरे व ग्रामपंचायत सदस्य यांनी मुरबे बंदराला विरोध करणारे निवेदन राजेंद्र गावित यांना सादर केले. राजेंद्र गावित निवडून आल्यास त्यांनी बंदराच्या विरोधात ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या सोबत उभे राहावे अशी जाहीर अपेक्षा व्यक्त केली.
राजेंद्र गावित यांनी खासदार होण्यापूर्वी बंदर प्रकल्पाच्या विरोधात भूमिका घेतली होती. तसेच बंदराचे काम सुरू झाल्यास आपण बुलडोझर समोर झोपू असे जाहीर घोषणाही केली होती.
मात्र महायुतीकडून (mahayuti) निवडणुकीसाठी (vidhan sabha elections) उमेदवारी मिळाल्यानंतर तसेच खासदारकीच्या कारकीर्दीत गावित यांनी या प्रकल्पांविषयी मौन पाळले. यामुळे सध्या विधानसभेच्या निवडणुकीसाठी प्रचारासाठी गावोगावी भेट देत असताना गावित यांच्या विरोधात तीव्र पडसाद उमटत आहेत.