Advertisement

‘त्या’ वादग्रस्त ट्विटवर अखेर फडणवीसांची माफी!

माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेती विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी अखेर छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्याबद्दल केलेल्या ट्विटसंबंधी माफी मागितली आहे.

‘त्या’ वादग्रस्त ट्विटवर अखेर फडणवीसांची माफी!
SHARES

माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेती विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी अखेर छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त ट्विटसंबंधी माफी मागितली आहे. छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या स्मृतीदिनानिमित्त अभिवादन करताना फडणवीस यांनी ६ मे रोजी केलेल्या ट्विटमध्ये शाहू महाराजांचा सामाजिक कार्यकर्ते, असा उल्लेख केला होता. त्यावरून नेटकऱ्यांनी फडणवीस यांच्यावर जबरदस्त टीका केली होती.

एवढंच नाही, तर छत्रपती संभाजीराजे यांनी देखील फडणवीस यांच्या ट्विटवर नाराजी व्यक्त केली होती. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कालच्या संपूर्ण प्रकारावर सर्व शिव-शाहू भक्तांची माफी मागावी. माझ्यासहित संपूर्ण राज्यातील शिव-शाहू भक्तांच्या भावना दुखावल्या आहेत, असं छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी म्हटलं होतं.

हेही वाचा - ‘राज्यात अघोषित आणीबाणी’, देवेंद्र फडणवीसांनी घेतली राज्यपालांची भेट

त्यानंतर फडणवीस यांना आपल्या चुकीची जाणीव झाल्यावर त्यांनी वादग्रस्त ट्विट डिलिट केलं. तसंच नवीन ट्विट करत याबाबत खुलासा देखील केला. आपल्या नव्या ट्विटमध्ये फडणवीस म्हणतात की, छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या स्मृतिदिनी केलेल्या ट्विटमध्ये चूक झाल्याचे लक्षात येताच लगेच मी ते ऑफिसला दुरुस्त करण्यास सांगितले. शाहू महाराज यांचा अनादर करण्याचे कधी माझ्या मनात सुद्धा येऊ शकत नाही. तथापि यामुळे भावना दुखावल्या गेल्यात. सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो.

यानंतर, झालेली चूक मान्य करून, तिच्यात सुधारणा केल्याने कमी पणा होत नसतो.  तुम्ही लोकभावनेचा आदर केलात. छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज व तसंच सर्वच महापुरुषांच्या अस्मिता सर्वांनीच जपल्या पाहीजेत. सर्वपक्षीय नेतृत्वाने तो आदर्श निर्माण करण्याची आवश्यकता आहे, असं छत्रपती संभाजीराजे यांनी त्यांना सुनावलं.

याआधी काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनीही देवेंद्र फडणवीस यांच्या वादग्रस्त ट्विटवर टीका केली होती. संघाच्या मनुवादी विचारांच्या मुशीतून आलेल्या देवेंद्र फडणवीस यांनी छत्रपती शाहू महाराजांना कार्यकर्ता म्हणून कमी लेखन आश्चर्यकारक नाही. संघानं मनुवाद आणायचा असल्यानं महात्मा फुले, शाहू महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा कायम आकस केला. मनातील भावना बाहेर आली एवढेच! जाहीर निषेध!, असं ट्विट सावंत यांनी केलं होतं.

हेही वाचा - महाराष्ट्रात कायदा सुव्यवस्था आहे की नाही? पालघर हत्या प्रकरणावरून फडणवीसांचा सवाल

संबंधित विषय