• ऑगस्ता वेस्टलँड हेलिकॉप्टर्सवरून विरोधक आक्रमक
  • ऑगस्ता वेस्टलँड हेलिकॉप्टर्सवरून विरोधक आक्रमक
SHARE

राज्य सरकार ऑगस्ता वेस्टलँड कंपनीची विमाने आणि हेलिकॉप्टर्स भाड्याने घेणार असल्याची बातमी 'मुंबई लाइव्ह'नं नुकतीच दिली होती. 'मुंबई लाइव्ह'च्या या बातमीनंतर विरोधकांनी सरकारला चांगलेच धारेवर धरले आहे. काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते सचिन सावंत यांनी सरकारच्या दुटप्पी धोरणाचा जाहीर निषेध केला. तसेच युपीच्या काळात ज्या कंपनीला काळ्या यादीत टाकण्याची प्रक्रिया सुरू केली होती त्या कंपनीची हेलिकॉप्टर्स वापरण्याचा का निर्णय घेतला? याचे स्पष्टीकरण राज्य सरकारने दिले पाहिजे. तसेच काँग्रेसचे केंद्रात सरकार असताना या कंपनीसोबत करार करण्यात आला होता. त्यामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला होता, याची चौकशी सीबीआयकडे दिल्याचे सांगत त्यांनी भाजपावर जोरदार टीका केली.[आधी हे पहा - राज्य सरकार घेणार वादग्रस्त ऑगस्ता वेस्टलँड कंपनीची हेलिकॉप्टर्स भाड्याने]

नरेंद्र मोदी यांचे सरकार केंद्रात आल्यानंतर या कंपनीसोबत असलेली खरेदी प्रक्रिया थांबविण्यात आली होती. तसेच माजी सरंक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांनीही स्पष्ट केले होते की, ऑगस्ता वेस्टलँड आणि त्याच्या उपकंपन्यांसोबतची खरेदी प्रक्रिया थांबवलेली आहे आणि या कंपन्यांना काळ्या यादीत टाकण्याची प्रक्रिया सुरू आहे. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी ऑगस्ता वेस्टलँड बोगस आणि फ्रॉड कंपनी आहे असे वक्तव्य केले आणि आता राज्य सरकार, तसेच मुख्यमंत्र्यांसह भाजपाचे अन्य मंत्री व्हीव्हीआयपींसाठी ऑगस्ता वेस्टलँड हेलिकॉप्टर्स कसे काय वापरू शकतात? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.भाजापाचा दुटप्पीपणा यावरूनच समोर येतो असे सांगत सीबीआयची चौकशी सुरू असताना याच कंपनीचे हेलिकॉपटर्स का? याची चौकशी व्हावी अशी मागणी त्यांनी यावेळी केली.

दरम्यान, राज्य सरकारने आपल्या शासकीय निर्णयात असे कुठेही नमूद केले नाही की, ऑगस्ता वेस्टलँडचेच हेलिकॉप्टर्स शासनाला पुरवले पाहिजेत, या एजन्सींनी ऑगस्ता वेस्टलँडची हेलिकॉप्टर्स भाड्याने दिली तर राज्य सरकार नाकारू शकते असं भाजपा प्रवक्ते मधू चव्हाण यांनी सांगितले. देशाचे भ्रष्ट्राचाराच्या माध्यमातून नुकसान केले असेल तर त्या कंपनीला कधीच केंद्रातील आणि राज्यातील सरकार अभय देणार नाही तसेच त्या कंपनीला फायदा होईल असे कोणतेही कृत्य करणार नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केले.


संबंधित विषय
ताज्या बातम्या