Advertisement

पालघर पोटनिवडणूक: ७ उमेदवारांचं भवितव्य मतदान यंत्रात बंदिस्त

सोमवारी सायंकाळी ६ वाजेपर्यंत अंदाजे ४६.५० टक्के मतदारांनी पालघर लोकसभा पोटनिवडणुकीतील ७ उमेदवारांचं भवितव्य मतदान यंत्रात बंदिस्त केलं. काही ठिकाणी मतदान यंत्रात झालेल्या बिघाडाव्यतीरिक्त पालघर जिल्ह्यात अत्यंत सुरळीतपणे मतदान झाल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी डाॅ. प्रशांत नारनवरे यांनी दिली.

पालघर पोटनिवडणूक: ७ उमेदवारांचं भवितव्य मतदान यंत्रात बंदिस्त
SHARES

प्रचारादरम्यान शिवसेना आणि भाजपामध्ये रंगलेलं वाक् युद्ध आणि मतदानाच्या दिवशी ईव्हीएम, व्हीव्हीपॅट मशिन्समध्ये झालेल्या बिघाडाच्या पार्श्वभूमीवर सोमवारी सायंकाळी ६ वाजेपर्यंत अंदाजे ४६.५० टक्के मतदारांनी पालघर लोकसभा पोटनिवडणुकीतील ७ उमेदवारांचं भवितव्य मतदान यंत्रात बंदिस्त केलं. काही ठिकाणी मतदान यंत्रात झालेल्या बिघाडाव्यतीरिक्त पालघर जिल्ह्यात अत्यंत सुरळीतपणे मतदान झाल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी डाॅ. प्रशांत नारनवरे यांनी दिली.

या मतदानानंतर सर्वांचं लक्ष आता ३१ मे रोजी होणाऱ्या मतमोजणीकडे लागलं आहे. या मतमोजणीला गोडाऊन क्र. २, सूर्याकॉलनी इथं सकाळी ८ वाजेपासून सुरूवात होणार आहे.

पालघर लोकसभा पोटनिवडणुकीत भाजपाचे राजेंद्र गावित, शिवसेनेचे श्रीनिवास वनगा, काँग्रेसचे दामोदर शिंगडा, माकपाचे किरण गहला, शंकर बदाडे (मार्क्ससिस्ट लेलिनिस्ट पार्टी आॅफ इंडिया) आणि बहुजन विकास आघाडीचे बळीराम जाधव तसंच १ अपक्ष उमेदवार असे एकूण ७ उमेदवार आखाड्यात आहेत.


विरोधक आक्रमक

पालघर लोकसभा पोटनिवडणुकीसाठी पहिल्यांदाच व्हीव्हीपॅट मशिनचा वापर करण्यात आला. सकाळी १० वाजता मतदानाला सुरूवात झाल्यानंतर काही वेळातच अनेक ठिकाणी मतदान यंत्रात बिघाड झाल्याच्या तक्रारी येऊ लागल्या. त्यानंतर काँग्रेस, शिवसेना, बविआ अशा पक्षांनी भाजपाला लक्ष्य करत निवडणूक आयोगाकडे फेरमतदान घेण्याची मागणीही केली.


फेरमतदानाची मागणी फेटाळली

त्यानंतर दुपारच्या सुमारास राज्य निवडणूक आयोगाने तात्काळ पत्रकार परिषद घेतली. या निवडणुकीसाठी १५ टक्के राखीव मशिन्स असल्याने तांत्रिक बिघाड झालेल्या मशिन्सच्या ठिकाणी नवीन मशिन्स बसवण्यात आल्या आहेत. त्यामुळे संबंधित ठिकाणि निवडणूक प्रक्रिया सुरळीतपणे पार पडत असल्याचं सांगून फेरमतदानाची मागणी फेटाळून लावली.


किती यंत्रे बिघडली?

पालघर जिल्ह्यामध्ये दिवसभरात २७६ व्हीव्हीपॅट मशिन्स बिघडल्याने बदलण्यात आल्या. सोबतच सीयू-१४ आणि बीयू-१२ मशिन्स देखील बदलण्यात आले.

पालघर जिल्ह्यात एकूण २०९७ मतदान केंद्र होते. तर जिल्ह्यासाठी २६०८ व्हीव्हीपॅट मशिन देण्यात आल्या होत्या. सोबतच २४८० सीयू, बीयू मशिन्स उपलब्ध करुन देण्यात आले होते.


किती मतदार?

पालघर लोकसभा मतदारसंघात १७ लाख ३१ हजार ७७ मतदार आहेत. यापैकी ९ लाख ७ हजार ४०० पुरुष, तर ८ लाख २३ हजार ५९२ महिला, इतर ८५ मतदार आहेत.



हेही वाचा-

ईव्हीएम बंद पडणं हा साम, दाम, दंड, भेदनितीचा भाग- संजय राऊत

पालघरमध्ये फेरमतदान नाहीच- निवडणूक अधिकारी




Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा