Advertisement

ईव्हीएम बंद पडणं हा साम, दाम, दंड, भेदनितीचा भाग- संजय राऊत

साम, दाम, दंड, भेदनितीचा भाग म्हणजेच ईव्हीएम मशिन बंद पाडणं. सत्तेत असलेल्यांकडून निवडणुका जिंकण्यासाठी यंत्रणांचा वापर होत आहे. त्यामुळेच आधी बूथ घोटाळे व्हायचे तिथं आता ईव्हीएम घोटाळे होत आहेत,'' अशी सणसणीत प्रतिक्रिया शिवसेना खासदार राऊत यांनी दिली

ईव्हीएम बंद पडणं हा साम, दाम, दंड, भेदनितीचा भाग- संजय राऊत
SHARES

पालघर पोटनिवडणुकीच्या मतदानादरम्यान ईव्हीएम मशिन बंद पडणं हा साम, दाम, दंड, भेद या नितीचा भाग असल्याचं म्हणत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी निवडणूक प्रक्रियेच्या पारदर्शकपणावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. तर आधी बूथ घोटाळे व्हायचे, आता ईव्हीएम घोटाळे होत असल्याचाही टोलाही त्यांनी सत्ताधाऱ्यांना लगावला.


सूरतवरून मशिन्स का आणल्या?

पालघर, भंडारा-गोंदिया पोटनिवडणुकांसाठी सोमवारी मतदान सुरू असतानाच अनेक ठिकाणी ईव्हीएम व्हीव्हीपॅट (व्होटर व्हेरिफाईड पेपर ट्रेल) मशिन्स अचानक बंद पडल्या. त्यामुळं मतदारांमध्ये संताप आणि नाराजी असतानाच ईव्हीएम मशिनच्या घोळाबाबत विरोधी पक्षांनी भाजपाला घेरण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.
महाराष्ट्रात पुरेशा ईव्हीएम मशिन असताना सूरतवरून मशिन का आणण्यात आल्या? असा सवाल करत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी भाजपाकडं बोट दाखवलं. तर शिवसेनेनेही याप्रकरणी भाजपासह मुख्यमंत्र्यांवर बाण रोखला आहे.


फेरमतदानाची गरज नाही

पालघरसह भंडारा-गोंदियामध्ये सोमवारी सकाळी नियोजीत वेळेत मतदानाला सुरूवात झाली. यावेळी पहिल्यांदाच ईव्हीएमसोबत व्हीव्हीपॅट (व्होटर व्हेरिफाईड पेपर ट्रेल) मशिनचा वापर करण्यात आला. मात्र सकाळी मतदान सुरू झाल्याबरोबर पालघरमध्ये ईव्हीएम मशिन बंद पडायला लागल्या. त्यामुळे नाराज झालेल्या विरोधकांसह मतदारांकडून फेरमतदानाची मागणी होऊ लागली. पण मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयानं त्वरीत पत्रकार परिषद घेत फेरमतदानाची शक्यता नाकारली. नादुरूस्त मशिनच्या जागी नवीन मशिन लावण्यात आल्याने फेरमतदानाची गरज नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.


व्हायरल आॅडियो क्लिप

काही दिवसांपूर्वी शिवसेनेचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी जाहीर सभेत मुख्यमंत्र्यांची एक आॅडियो क्लिप एेकवली होती. या क्लिपमध्ये मुख्यमंत्र्यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधताना साम, दाम, दंड, भेदाची भाषा करत निवडणूक जिंकण्यासाठी वाटेल ते करा, असे आदेश दिले होते. या आॅडियो क्लिपबाबत निवडणूक आयोगाकडं तक्रार दाखल झाली आहे. मुख्यमंत्र्यांनी ही आॅडिओ क्लिप आपलीच आहे असं कबूल करत शिवसेनेनं त्यात छेडछाड केल्याचा पलटवार केला.


काय म्हणाले राऊत?

त्यातच मतदानादरम्यान ईव्हीएम मशिन बंद पडल्यानं राऊत यांनी भाजपासह मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला. ''साम, दाम, दंड, भेद नीतीचा भाग म्हणजेच ईव्हीएम मशिन बंद पाडणं. सत्तेत असलेल्यांकडून निवडणुका जिंकण्यासाठी यंत्रणांचा वापर होत आहे. त्यामुळेच आधी बूथ घोटाळे व्हायचे तिथं आता ईव्हीएम घोटाळे होत आहेत,'' अशी सणसणीत प्रतिक्रिया राऊत यांनी दिली.


एका रात्रीत सेटींग

जनतेला वेठीस धरू नका. पालघर, भंडारा-गोंदिया या तिन्ही ठिकाणी मिळून ४०० ठिकाणी मशिन बंद पडल्या आहेत. हे ठरवून झालेलं आहे. कारण दोन्ही ठिकाणी भाजपाला हरण्याची खात्री झाल्यानं त्यांनी रात्रीच्या रात्री मशिन सेट करत भंगार मशिन आणल्या आहेत. ईव्हीएम मशिनची चावी आणि रिमोट कंट्रोल हातात घेत निवडणुका जिंकण्याचा प्रयत्न होतोय. ईव्हीएम घोटाळे होणं ही देशासाठी धोक्याची घंटा असल्याचंही राऊत यांनी म्हटलं आहे.

शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेसबरोबरच बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष हितेंद्र ठाकुर यांनीही भाजपा रडीचा डाव खेळत असल्याचा आरोप केला आहे.



हेही वाचा-

साम, दाम, दंड, भेदाने आणा पेट्रोल-डिझेलचे दर नियंत्रणात- आदित्य ठाकरे

पेट्रोल, डिझेल दरवाढीविरोधात काँग्रेसचा भव्य मोर्चा



Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा