पवारांना खुर्ची मिळवून देण्यासाठी सोनिया गांधी यांची फिल्डिंग

Mumbai
पवारांना खुर्ची मिळवून देण्यासाठी सोनिया गांधी यांची फिल्डिंग
पवारांना खुर्ची मिळवून देण्यासाठी सोनिया गांधी यांची फिल्डिंग
See all
मुंबई  -  

जुलै 2017 मध्ये होऊ घातलेल्या देशाच्या राष्ट्रपतीपदासाठीच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांना ‘विरोधकांच्या सहमतीचे उमेदवार’ म्हणून पुढे आणण्याचे जोरदार प्रयत्न सुरू झाले आहेत. याबाबतीत चक्क काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी पुढाकार घेत आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शरद पवार यांना राष्ट्रपतीपदासाठी विरोधकांच्या पसंतीचे उमेदवार म्हणून संधी मिळावी यासाठी सोनिया गांधी यांनी समाजवादी पार्टीचे मार्गदर्शक मुलायमसिंह यादव आणि बहुजन समाज पार्टीच्या सर्वेसर्वा मायावती या दोन विरुद्ध टोकाच्या नेत्यांशी चर्चा केली आहे. 

उत्तर प्रदेशमध्ये नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत सपा आणि बसपाला दारुण अपयशाचा सामना करावा लागला. पण राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत सर्व पक्षाच्या आमदार आणि खासदारांच्या मताला महत्त्व असतं. त्यामुळे संख्येच्या बाबतीत तुलनेनं कमी असलेल्या पक्षांच्या लोकप्रतिनिधींच्या मताची बेगमी केली जात आहे. सोनिया गांधी यांच्या मुलायमसिंह यादव आणि मायावती यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर आता काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी आणि उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्याशी चर्चा करणार आहेत. दुसरीकडे डाव्या विचारांच्या नेत्यांनी याआधीच शरद पवार यांच्या नावाला सहमती दर्शवली आहे.

शरद पवार यांनी आपण राष्ट्रपतीपदाच्या रेसमध्ये नसल्याचं वारंवार सांगितलं आहे. आपल्या पक्षाच्या लोकप्रतिनिधींची संख्या आपल्याला राष्ट्रपतीपदाची स्वप्नं पाहण्याची परवानगी देत नाही, हा समर्पक युक्तिवादही त्यांनी केला. पण असं करत असतानाच राष्ट्रपतीपदाची निवड बिनविरोध व्हावी, अशी इच्छा व्यक्त करत त्यांनी स्वतःची दावेदारी चर्चेत राहील, याचीही काळजी घेतली. यासंदर्भातलं वृत्त ‘मुंबई लाइव्ह’ने 24 एप्रिल रोजी दिलं होतं.

[आधी हे पहा - बिनविरोध राष्ट्रपतीपदासाठी शरद पवारांचा 'पॉवर'गेम, पवारांच्या नावाला शिवसेनेचे समर्थन]

त्यानंतर लगेच म्हणजे 26 एप्रिलला शरद पवार यांनी सोनिया गांधी यांची ‘10 जनपथ’ या त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. त्यानंतरच ‘योगायोगानं’ सोनिया गांधी यांनी विरोधी पक्षातल्या नेत्यांशी चर्चेला सुरुवात केली.

दरम्यान, सोनिया गांधी यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रपतीपदासाठी नव्हे तर देशाच्या उपराष्ट्रपतीपदावरची दावेदारी पक्की करण्याचा प्रयत्न सुरु केला असल्याची माहिती गांधी कुटुंबाच्या जवळ असलेल्या एका नेत्याने दिली आहे. सन 1990 पासून शरद पवार यांना देशाचं पंतप्रधानपद गुंगारा देत आलं आहे. देशाच्या राजकारणातल्या पन्नास वर्षांच्या स्थित्यंतराचे साक्षीदार असलेल्या शरद पवार यांनी आपल्यातलं राजकीय कसब वारंवार सिद्ध केलं आहे. प्राप्त परिस्थितीत पवार यांनी आपला नवा ‘पॉवर गेम’ खेळला, तरी त्याचं कुणाला आश्चर्य वाटणार नाही. किंबहुना पवारांचा नवा पॉवर गेम काय असेल? हे जाणून घ्यायला राजकीय विश्लेषकसुद्धा उत्सुक आहेत.


Loading Comments

संबंधित बातम्या

© 2018 MumbaiLive. All Rights Reserved.