नगरसेवकांना हजार रूपयात लॅपटॉप

 Pali Hill
नगरसेवकांना हजार रूपयात लॅपटॉप

मुंबई - मुंबई महापालिकेच्या नगरसेवकांना देण्यात आलेले लॅपटॉप परत घेण्याची प्रक्रिया सुरू असून अवघे एक हजार रुपये भरा आणि लॅपटॉपचे मालक व्हा अशीच योजना महापालिकेनं जाहीर केली आहे. नगरसेवकांनी हे लॅपटॉप पाच वर्ष वापरल्यामुळे एक हजार रुपये भरून लॅपटॉप त्यांनाच देण्याचा निर्णय घेतला आहे. 

मुंबई महापालिकेतील 232 नगरसेवकांना लॅपटॉप देण्यात आले होते. याबरोबरच मोबाईल आणि सिम कार्ड देण्यात आले. मोबाईल हे मालकी तत्वावर देण्यात आले होते, तर सिम कार्ड प्रीपेड करून त्यांच्या नावे करून देण्यात येत आहे. निवडणूक आचारसंहिता लागू होणार असल्यामुळे हे लॅपटॉप परत घेण्यात येणार आहे. यासाठी आयटी विभागाने लॅपटॉपची किंमत निश्चित केली आहे.

नगरसेवकांना देण्यात आलेल्या लॅपटॉपची किंमत 37 हजार रुपये होती. पण, नगरसेवकांनी 5 वर्ष हे लॅपटॉप वापरले म्हणून 1 हजार रुपये एवढी किंमत निश्चित करण्यात आली आहे. आयटी विभागाच्या म्हणण्यानुसार, लॅपटॉपची किंमत दरवर्षी ६० टक्के कमी होते, त्यानुसार वापरण्यात आलेल्या या लॅपटॉपची किंमत एक हजार एवढी निश्चित करण्यात आले असून त्यांनी याबाबत महापालिका चिटणीस विभागाला कळवलं आहे. त्याप्रमाणे सर्व नगरसेवकांना बुधवारी पत्र पाठवून त्यांना सूचित करण्यात आले आहे.

मागील निवडणुकीपूर्वी नगरसेवकांना देण्यात आलेले लॅपटॉप परत घेताना सुमारे २२ हजार रुपयांचे शुल्क निश्चित करण्यात आले होते. त्यावेळी ही रक्कम अधिक असल्यामुळे सर्वच नगरसेवकांनी शुल्क न भरता लॅपटॉप चिटणीस खात्याकडे परत केले होते. मागील वर्षी नगरसेवकांनी केवळ दोन ते अडीच वर्षच लॅपटॉप वापरले होते म्हणून त्यावेळी अधिक शुल्क आकारले होते, पण या वेळी त्यांनी पाच वर्ष लॅपटॉप वापरल्यामुळे हे हे शुल्क एक हजार रुपये निश्चित केले असल्याचे आयटी विभागाचे प्रमुख अधिकारी महेश नार्वेकर यांनी स्पष्ट केले.

Loading Comments