Advertisement

पूरग्रस्त भागातील दौरे टाळा, शरद पवारांचा राजकीय नेत्यांना सल्ला

संकटात सापडलेल्या लोकांना मदतीची जास्त गरज असून राजकीय नेत्यांनी अशा भागांचा दौरा करणं टाळावं.

पूरग्रस्त भागातील दौरे टाळा, शरद पवारांचा राजकीय नेत्यांना सल्ला
SHARES

महाराष्ट्रातील (maharashtra) पश्चिम महाराष्ट्र, कोकण आणि इतर भागात मुसळधार पाऊस झाल्यानं पूरपरिस्थिती उद्भवली आहे. या पूरग्रस्त भागांची सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील नेत्यांकडून पाहणी केली जात असून जनतेला धीर देण्याचा प्रयत्न केला जात आहे. परंतु संकटात सापडलेल्या लोकांना मदतीची जास्त गरज असून राजकीय नेत्यांनी अशा भागांचा दौरा करणं टाळावं. जेणेकरून प्रशासकीय यंत्रणांना विनाअडथळा लोकांची मदत करता येईल, असा सल्ला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिला आहे.

मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत शरद पवार यांनी सांगितलं की, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा, सांगली या जिल्ह्यांना पुराचा मोठा फटका बसला आहे. पुरामुळे घरांचं व शेतीचं नुकसान मोठ्या प्रमाणात झालं आहे. राज्यात ७ ते ८ जिल्ह्यात पूरस्थिती आहे. अशा परिस्थितीत जनतेला तातडीने मदतीची गरज आहे. राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्टकडून त्यांनी यावेळी पूरग्रस्तांना अडीच कोटी रुपयांची मदत देण्यात येईल. ही मदत दोन दिवसांत पोहोचवली जाईल. पुराचा फटका बसलेल्या १६ हजार कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंच्या कीट वाटण्यात येतील. त्याचबरोबर पूरग्रस्त भागात डॉक्टरांची पथकं पाठवणार असल्याचंही पवार म्हणाले. 

हेही वाचा- महापालिका निवडणुकीसाठी मनसे-भाजप युती होणार?

पूरग्रस्त भागातील राजकीय दौऱ्याविषयी शरद पवार (sharad pawar) म्हणाले, जनतेला प्रशासकीय मदतीची खूप गरज आहे. पूरग्रस्त भागात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते यांनी दौरे केले. त्यांचे दौरे लोकांना धीर देण्यास उपयोगी पडतात. त्यामुळे या नेत्यांच्या दौऱ्यावर आमची हरकत नाही. पण, मला असं वाटतं की, माझ्यासारखे नेते गेले, तर तिथल्या प्रशासकीय यंत्रणेवर ताण पडतो. कारण बाकीची यंत्रणा फिरवावी लागते. आपल्या भोवती यंत्रणा ठेवणं योग्य नाही. त्यामुळे पुनर्वसनाच्या कामावरुन लक्ष विचलित होतं. म्हणून मला असं वाटतं की, माझ्यासारख्या इतर नेत्यांनी असे दौरे करणं टाळायला हवं.

माझा पूर्वीचा अनुभव, विशेषत: लातूरच्या वेळचा अनुभव आहे. अशा घटनानंतर अनेक लोक गाड्या घेऊन त्या ठिकाणी जातात. मी लातूरला असताना, आम्ही सगळे जण कामात होतो, पंतप्रधान येत होते. त्यावेळी मी पंतप्रधानांना सांगितलं १० दिवस येऊ नका. तुम्ही आला तर यंत्रणा तिकडे लावावी लागेल. माझी विनंती मान्य करून तेव्हा पंतप्रधान १० दिवसानंतर आले होते, आताही तशीच परिस्थिती आहे, असं शरद पवार यांनी सांगितलं.


Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा