युती अडकणार प्रभाग वाटपात

  Pali Hill
  युती अडकणार प्रभाग वाटपात
  मुंबई  -  

  मुंबई - शिवसेना आणि भाजपा युतीची सकारात्मक पावले पडत असली तरी ही युती आकड्यात अडकण्याची शक्यता आहे. युती व्हावी ही शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुखमंत्री देवेंद्र फडणवीस यांची इच्छा आहे. परंतु विधानसभा निवडणुकीत भाजपाचे 16 आमदार निवडून आल्यामुळे यंदा महापालिका निवडणुकीत मागील वेळेच्या तुलनेत अधिक जागा मागितल्या जाणार आहेत. मात्र, या जागा देण्यावर दोघांचे एकमत झाले तरी आरक्षणामुळे प्रभागांच्या अदलाबदलीत युतीची मोट बांधण्याऐवजी सुटण्याचीच अधिक शक्यता आहे.

  मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिवसेना-भाजपाची युती होण्याबाबत शंका कुशंका वर्तवली जात असून, आता दोन्ही पक्षांनी युतीच्या दृष्टीने चर्चेची सकारात्मक पावले उचलली जात असल्याचे स्पष्ट केले. राज्य निवडणूक आयोगाने बुधवारी महापालिका निवडणूक कार्यक्रम जाहीर करून येत्या 21 फेब्रुवारीला निवडणूक घेण्याचे जाहीर केले.
  महापालिकेच्या मागील निवडणुकीत शिवसेने 135, भाजपाने 63 आणि रिपाइंने 29 जागा लढवल्या होत्या. मात्र, लोकसभा निवडणुकीत दोन्ही पक्षांची युती झाली तरी विधानसभा निवडणुकीत त्यांनी स्वतंत्र निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत शिवसेनेचे 15 आणि भाजपाचे 16 आमदार निवडून आले. त्यामुळे निश्चितच भाजपाकडून अधिक जागांची मागणी होत आहे. शिवसेनेच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, भाजपाला 90 पर्यंत जागा सोडण्यास शिवसेना तयार आहे. त्यात वाढ होऊन चर्चेअंती 100 पर्यंत जागा भाजपाला सोडण्यास तयारी दर्शवली जाईल. त्यामुळे आधीच आकड्यांचा घोळ असून त्यातही जर दोन्ही पक्षांची दिलजमाई झाली, तरीही बदललेल्या प्रभागांच्या आरक्षणामुळे जागा वाटपात दोन्ही पक्षांची ओढाताण होणार आहे. प्रभागांच्या नवीन आरक्षणामुळे दोन्ही पक्षातील विद्यमान नगरसेवकांचे वॉर्डच गायब झाले आहेत. त्यामुळे युती झाली तर प्रभागांच्या अदलाबदलीत दोन्ही पक्षांचे एकमत होणे अवघड आहे. यातच युतीची नाळ तुटण्याची शक्यता राजकीय जाणकारांकडून वर्तवली जात आहे.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.