Advertisement

वंचित बहुजन आघाडीच्या बॅनरखाली प्रकाश आंबेडकरांची एेक्याची हाक

भारिप बहुजन महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनीही एेक्याची हाक दिली आहे. भाजपाचा विजयरथ रोखण्यासाठी राज्यातील पुरोगामी पक्षांनी एकत्र येत वंचित बहुजन आघाडी बॅनरखाली निवडणुका लढवण्याचा निर्णय घेतला आहे.

वंचित बहुजन आघाडीच्या बॅनरखाली प्रकाश आंबेडकरांची एेक्याची हाक
SHARES

आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेनं स्वबळाची हाक देत भाजपाला आव्हान दिलं आहे. तर दुसरीकडं भाजपाला निवडणुकीत मात देण्यासाठी विरोधकांनी मोट बांधण्यास सुरूवात केली आहे. त्याचाच भाग म्हणून भारिप बहुजन महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनीही एेक्याची हाक दिली आहे. भाजपाचा विजयरथ रोखण्यासाठी राज्यातील पुरोगामी पक्षांनी एकत्र येत वंचित बहुजन आघाडी बॅनरखाली निवडणुका लढवण्याचा निर्णय घेतला आहे. बुधवारी आंबेडकरांनी पुण्यात एक पत्रकार परिषद घेत काँग्रेस-राष्ट्रवादीला सोबत घेत निवडणुका लढण्याचे संकेत दिले. त्यासाठी लवकरच काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसशी चर्चा करणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.


प्रत्येकी २ जणांना उमेदवारी

आलुतेदार-बलुतेदार, वंचित समाज, मुस्लिम यांच्यापर्यंत लोकशाही पोहचावी, त्यांनाही सत्तेत वाटा मिळावा हेच उद्दिष्ट ठेवत वंचित बहुजन आघाडीची स्थापना आंबेडकरांसह काही पुरोगामी पक्षांनी एकत्र येत केली आहे. त्यानुसार वंचित बहुजन समाजातील प्रत्येकी २ जणांना उमेदवारी देण्याचाही निर्णय वंचित बहुजन आघाडीनं घेतला आहे.२०१९ च्या निवडणुकीत या आघाडीला भरीव यश मिळेल, असा विश्वासही आंबेडकरांनी व्यक्त केला आहे.


२७ जुलैपासून दौरा

काँग्रेस-राष्ट्रवादीशी वाटाघाटी करण्याचे संकेत आंबेडकरांनी दिले आहेतच; पण त्याचवेळी राज्यातील इतर पुरोगामी पक्षांना एकत्र घेण्यासाठी राज्यव्यापी दौरा आंबेडकर करणार आहेत. या दौऱ्याला २७ जुलैपासून सोलापूर येथून सुरूवात होणार आहे.


धर्मवाद्यांचे मित्र नकोत

काँग्रेस-राष्ट्रवादीबरोबरच रामदास आठवले यांना सोबत घेणार काय? आठवले यांनी याआधीच तुमचं प्रतिनिधीत्व मान्य करण्याचीही तयारी दाखवली आहे, असा प्रश्न प्रसारमाध्यमांनी विचारला असता आंबेडकरांनी त्यावर कोणतंही स्पष्ट उत्तर दिलं नाही. मात्र पुरोगामी पक्षांनाच बरोबर घेणार आहोत, धर्मवादी आणि धर्मवाद्यांचे मित्र हे आमच्यासाठी प्रतिवादी असल्याचं म्हणत एकाप्रकारे रामदास आठवलेंना वंचित बहुजन आघाडीपासून दूर ठेवणार असल्याचेचं संकेत दिले. तर भाजपाबरोबर सत्तेत असलेल्या आठवलेंना धर्मवाद्यांचे मित्र म्हणून टोलाही लगावला आहे.


फुले पगडीचं कौतुक

आठवलेंना धर्मवाद्यांचे मित्र म्हणून प्रतिगामी ठरवतानाच आंबेडकरांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना मात्र प्रतिगामी मानत नसल्याचं स्पष्ट केलं आहे. पवारांच्या काही भूमिका पुरोगामी विचारांना धरून नाहीत, त्या भूमिकांमध्ये सुधारणा व्हायला हवी असंही त्यांनी यावेळी म्हटलं आहे. तर पुणेरी पगडी नि फुले पगडीवरून सुरू असलेल्या वादाबाबत मत मांडतानाही आंबेडकरांनी पवारांचं फुले पगडी स्वीकारल्याबद्दल कौतुक केलं आहे.



हेही वाचा-

दंगली भडकवत निवडणुका पुढं ढकलण्याचा सरकारचा डाव- प्रकाश आंबेडकर

मुख्यमंत्र्यांची संभाजी भिडेंना क्लिनचीट



Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा