येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला वंचित बहुजन आघाडीसोबत भाजपा-शिवसेना महायुतीचा सामना करायचा असल्यास जास्तीत जास्त ४० जागाच लढता येतील. याचं कारण म्हणजे वंचित बहुजन आघाडीने काँग्रेसला विधानसभेत २८८ पैकी केवळ ४० जागाच देऊ केल्या आहेत. एवढ्या जागांवर लढायचं आहे तर बोला, नाहीतर आम्ही सगळ्या जागांवर लढण्यास समर्थ आहोत, असं सूचवत ‘वंबआ’ने एकप्रकारे काँग्रेसची थट्टाच केली आहे.
वंचितच्या पदाधिकाऱ्यांनी बुधवारी दादरच्या आंबेडकर भवनात पत्रकार परिषद घेऊन काँग्रेसला केवळ ४० जागा सोडण्याची तयारी दाखविली. या प्रस्तावाबाबत १० दिवसांमध्ये काँग्रेसने निर्णय घ्यावा, अन्यथा आम्ही स्वबळावर लढू, असा इशाराही वंचित बहुजन आघाडीचे महासचिव गोपीनाथ पडळकर यांनी मुंबईत पत्रकारांशी बोलताना दिला. ‘वंबआ’च्या या प्रस्तावावर आता काँग्रेस काय उत्तर देतेय हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे.
भारिप बहुजनचे नेते प्रकाश आंबेडकर आणि एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांच्या पुढाकाराने स्थापन झालेल्या वंचित बहुजन आघाडीने लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडीला जोरदार धक्का दिला होता. महाआघाडीत सामील होण्यावरून बराच काथ्याकूट झाल्यानंतर वंचितने राज्यातील सर्वच्या सर्व ४८ जागा लढवल्या. या निवडणुकीत भाजपाची ‘बी’ टीम अशी टीका झेलणाऱ्या वंचितचा एकही उमेदवार जिंकून आला नाहीत. परंतु काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची पारंपारिक मतं फोडण्यात वंचितने यश मिळवलं.
नांदेडमध्ये अशोक चव्हाण यांचा पराभव होण्यात वंचित बहुजन आघाडीची भूमिका कळीची ठरली. एकाप्रकारे भाजपने महाराष्ट्रात मिळवलेल्या विजयात वंचित बहुजन आघाडीची भूमिका महत्त्वाची ठरली. राज्यातील १० ते १२ मतदारसंघांमध्ये वंचितच्या उमेदवारांनी ५० हजारांहून अधिक मतं घेतली. तर ७ मतदारसंघात वंचित दुसऱ्या क्रमांकावर राहिली. हे सगळं यशापयश बघता वंचितने राज्यात सर्वच्या सर्व जागा लढवण्याचं लढवलं आहे.
हेही वाचा-
Video: मुसळधार पावसात मुंबईची वाताहात, म्हणून राज ठाकरेंचं 'हे' वक्तव्य ठरतंय महत्त्वाचं
RSS मानहानी प्रकरण: आधीपेक्षा दहापट त्वेषाने लढणार- राहुल गांधी