Advertisement

राष्ट्रपतींनी घेतली लतादिदींची भेट

राज्याच्या दौऱ्यावर असलेले देशाचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी गानसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर यांची रविवारी त्यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली.

राष्ट्रपतींनी घेतली लतादिदींची भेट
SHARES

राज्याच्या दौऱ्यावर असलेले देशाचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी गानसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर यांची रविवारी त्यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते राजभवन येथील बंकर संग्रहालयाचं उद्घाटन करण्यात आलं. या उद्धाटनानंतर त्यांनी लतादीदींची भेट घेतली. या भेटीदरम्यान राष्ट्रपतींनी लतादीदींच्या प्रकृतीची आस्थेवाईकपणे विचारपूस केली. तसंच, लतादीदींच्या कर्तृत्वाचं गुणगान करताना दीदींनी अजरामर केलेलं ‘ए मेरे वतन के लोगों’ हे आपलं सर्वात आवडतं गीत असल्याच्या भावना राष्ट्रपतींनी व्यक्त केल्या. याबाबत लता मंगशेकर यांनी ट्विटरवरून माहिती दिली आहे.

सदिच्छा भेट

राष्ट्रपती कोविंद यांनी पेडररोडवरील प्रभुकुंज या लता मंगेशकर यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट देऊन मंगेशकर कुटुंबीयांशी संवाद साधला. यावेळी राष्ट्रपतींच्या पत्नी सविता, मुलगी स्वाती, राज्यपाल सी. विद्यासागर राव, त्यांच्या पत्नी विनोदा, तसेच उच्च तंत्रशिक्षण मंत्री विनोद तावडे उपस्थित होते. मंगेशकर कुटुंबीयातील ज्येष्ठ संगीतकार हृदयनाथ मंगेशकर, उषा मंगेशकर, मीना मंगेशकर आणि त्यांची नातवंडंही उपस्थित होती.

प्रसन्न वाटले

लता मंगेशकर यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर भेटीदरम्यानचा एक फोटो शेअर केला आहे. तसंच, 'नमस्कार, आपल्या देशाचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद मोठ्या मनाने आज घरी आले. निवासस्थानी आल्यानंतर त्यांनी माझी भेट घेतली त्यामुळं मला फार प्रसन्न वाटले. मी आभारी आहे. सर, तुम्ही आमचा गौरव केला, असं लिहिलं आहे.

उत्तम आरोग्याच्या शुभेच्छा 

लता मंगेशकर यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची सदिच्छा भेट घेतल्यानं आनंद वाटला. यावेळी मी लतादीदींना उत्तम आरोग्याच्या शुभेच्छा दिल्या. आपल्या मधूर आवाजानं लता दीदींनी भारताचा गौरव वाढवला तसेच आपल्या सर्वांच्या आयुष्यात गोडवा निर्माण केला आहे. त्यांच्याकडून आम्हाला सतत प्रेरणा मिळते, असं राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी ट्विटरवर एक फोटो शेअर करत म्हटलं आहे.



हेही वाचा -

राज भवनमधील भुयार लवकरच हाेणार पर्यटकांसाठी खुलं

गणेशोत्सव २०१९: मंडपासाठी केवळ २६२० गणेशोत्सव मंडळांचे अर्ज



Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा