Advertisement

राज्याचे कृषी पर्यटन धोरण जाहीर


राज्याचे कृषी पर्यटन धोरण जाहीर
SHARES

महाराष्ट्रातील ग्रामीण पर्यटनाला चालना देण्याच्या दृष्टीने राज्य शासनाच्या पर्यटन विभागामार्फत बुधवारी राज्याचे स्वतंत्र कृषी पर्यटन धोरण जाहीर करण्यात आले. या धोरणात अंतर्भूत करण्यात आलेल्या विविध बाबींची येत्या काळात अंमलबजावणी करून ग्रामीण पर्यटन, ग्रामीण रोजगार आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला मोठी चालना देण्यात येईल, अशी घोषणा पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत केली.


24 नोव्हेंबर रोजी मुंबई - मालदीव पहिले क्रूझ

रावल म्हणाले, महाराष्ट्रात क्रूझ पर्यटनाला चालना देण्यासाठी पर्यटन विभागाने महत्त्वाची पावले उचलली आहेत. येत्या 24 नोव्हेंबर रोजी मुंबई - कोचीन - मालदीव दरम्यान पहिले कोस्टा क्रूझ प्रवास करणार आहे. या क्रूझमधील अनुभव लक्षात घेऊन नंतर श्रीलंका किंवा इतर ठिकाणीही क्रूझसेवा सुरू करण्यात येईल. देशात पुढील चार वर्षात साधारण 950 क्रूझ सुरू होणार असून, यापैकी 80 टक्के क्रूझ या मुंबई पोर्टला येतील, अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.  कार्निव्हल ही क्रूझ क्षेत्रातील सर्वात मोठी कंपनीही भारतात क्रूझ सेवा सुरू करत आहे, अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली.


इको सेन्सिटिव्ह झोनमध्ये ई - व्हेईकल

राज्यातील इको सेन्सिटिव्ह झोनमध्ये ई - व्हेईकल झोन सुरू करण्याबाबत नियोजन करत आहोत. जेणेकरुन शाश्वत पर्यटनाला चालना मिळण्याबरोबरच पर्यावरण रक्षणासाठीही त्याचा उपयोग होऊ शकेल. राज्यातील कोणत्या पर्यटनस्थळांवरील कोणत्या भागात हे व्हेईकल झोन सुरू करणे उचीत ठरेल याचा विचार करण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले.  


आयएनएस विराट वसई-विरार भागात स्थापीत करण्यासाठी प्रयत्न

दक्षिण मुंबईत मोठ्या प्रमाणात हेरीटेज  इमारती आहेत. या इमारतींची माहिती, इतिहास, छायाचित्रे, रचना आदींविषयक माहिती क्यूआर कोडवर उपलब्ध करण्यात येईल. आयएनएस विराटवर नौदलाचे संग्रहालय स्थापन करण्यात येत आहे. आयएनएस विराट संग्रहालयाच्या निर्मितीनंतर वसई-विरार भागात स्थापित करण्यासाठी आम्ही केंद्र शासनाच्या संरक्षण विभागाकडे प्रयत्न करत आहोत. पर्यटन विभागाने यासाठी पुढाकार घेतला आहे, अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली. मुंबईतील न्यू कस्टम हाऊसला येत्या २९ ऑक्टोबर रोजी १०० वर्षे पूर्ण होत आहेत. यानिमित्त त्यांना सहकार्य करून एमटीडीसीमार्फत हेरीटेज रनसारख्या उपक्रमांचे आयोजन करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.


४०० तरुणांना गाईडचे प्रशिक्षण

पर्यटन धोरणानुसार सध्या मुंबई, औरंगाबाद, सिंधुदूर्ग आणि नागपूर येथे ४०० तरुणांना गाईडचे प्रशिक्षण देण्याचे नियोजन केले आहे. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात किमान २० तरुणांना प्रशिक्षण देण्याचे नियोजन आहे. प्रत्येक पर्यटनस्थळावर एमटीडीसी प्रशिक्षीत अधिकृत गाईड असावेत, असा आमचा प्रयत्न आहे. या माध्यमातून पर्यटकांना अधिकृत माहिती मिळण्याबरोबरच रोजगार निर्मितीलाही राज्यात चालना मिळेल, असेही त्यांनी सांगितले.  


पर्यटन विभागामार्फत साजरे केले जाणारे एलोरा महोत्सव, नागपूर फूड फेस्टिव्हल, सारंगखेडा चेतक महोत्सव, कालिदास महोत्सव या विविध महोत्सवांची पूर्वतयारी करून नियोजन करण्यात येईल. राज्य शासनाने २०१६ मध्ये जाहीर केलेल्या पर्यटन धोरणातील अनेक निर्णय आता प्रत्यक्षात आले आहेत, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा