गेल्या आठवड्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निवासस्थानाबाहेर आंदोलन केल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी आज, १३ एप्रिल रोजी आणखी एकाला अटक केली. चंद्रकांत सूर्यवंशी असं आरोपीचं नाव असून तो पुण्यातील युट्युब चॅनेलचा पत्रकार आहे, असं पोलीस अधिकाऱ्यानं सांगितलं.
आतापर्यंत एकूण ११५ जणांना ताब्यात घेण्यात आलं आहे. त्यापैकी १०९ जणांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
मुंबईच्या गावदेवी पोलिस स्टेशनच्या पथकानं त्याला पुण्यातून ताब्यात घेतलं आणि मुंबईत आणलं, असं अहवालात म्हटलं आहे. त्याची चौकशी केली जात आहे.
याशिवाय, आरोपी वकील गुणरत्न सदावर्ते याला ताब्यात घेण्यासाठी सातारा पोलिसांचे पथक मंगळवारी मुंबईत पोहोचले.
सदावर्ते सध्या मुंबई पोलिसांच्या ताब्यात असून त्यांना गिरगाव न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. सातारा पोलिस गुणरत्न सदावर्ते यांना ताब्यात घेण्याची शक्यता आहे.
मंगळवार, १२ एप्रिल रोजी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना, महाराष्ट्राचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निवासस्थानावर महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (MSRTC) कर्मचाऱ्यांनी काढलेला निषेध मोर्चा हा हल्ला असल्याची टिप्पणी केली.
नुकतेच शुक्रवारी त्यांच्या निवासस्थानी झालेल्या कथित हल्ल्यानंतरही अमरावती इथल्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुखांच्या धाडसाचं कौतुक सर्वत्र झालं. काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी सोमवारी पवारांचे कौतुक केले आणि त्यांच्या धाडसाचे कौतुक केलेच पाहिजे, असं म्हटलं. त्यांना राज्याचे मुख्यमंत्री केले असते तर महाराष्ट्र सरकारची प्रतिमा वेगळी असती, असंही त्या म्हणाल्या.
हेही वाचा