Advertisement

यापुढे गटबाजीचे राजकारण नको - राज ठाकरे


यापुढे गटबाजीचे राजकारण नको - राज ठाकरे
SHARES

विधानसभा निवडणुका असो किंवा नुकत्याच पार पडलेल्या पालिका निवडणुका असोत, या निवडणुकांमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या इंजिनाला लागलेली घरघर दूर करण्यासाठी आता खुद्द मनसे अध्यक्ष राज ठाकरे मैदानात उतरले आहेत. त्यासाठी मनसेच्या ‘इंजिना’चे स्पेअर पार्टस् राज ठाकरे यांनी बदलले आहेत. विशेष म्हणजे सोमवारी माटुंग्याच्या यशवंत नाट्य मंदिरात आयोजित करण्यात आलेल्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात राज यांनी नेत्यांसह कार्यकर्त्यांनाही खडेबोल सुनावले.


'गटबाजीचे राजकारण यापुढे नको'

मनसेमध्ये गेल्या काही वर्षांपासून गटबाजीचे राजकारण उफाळून आले होते. याचाच परिणाम म्हणून की काय, मनसेच्या इंजिनाला निवडणुकांमध्ये ब्रेक लागला. तसेच मुंबईत मनसेच्या बैठकांमध्ये नेत्यांपासून पदाधिकाऱ्यांमध्येही गटबाजी उफाळून आली होती. मात्र 'आता यापुढे गटबाजीचे राजकारण मला नकोय', असे राज ठाकरे यांनी नेत्यांसह पदाधिकाऱ्यांना सुनावले. तसेच 'यापुढे पक्षातल्या प्रत्येकाला त्यांनी करायच्या कामांची आचारसंहिता असेल', असे देखील राज यांनी ठणकावून सांगितले.


'पक्षात कुणाला ठेवायचे कुणाला काढायचे हा माझा अधिकार'

'मी पक्षाच्या नेत्यांना दूर केले अशा बातम्या मध्यंतरी आल्या, पण पक्षात कुणाला ठेवायचे कुणाला काढायचे हा माझा अधिकार आहे,' असा सज्जड दमच राज यांनी यावेळी सगळ्यांना भरला. यापुढे कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांसाठी पक्षकार्याची एक यंत्रणा असेल, तुम्हाला मला आता फसवता येणार नाही, असे राज यांनी सगळ्यांना खडसावले.


मेळाव्याला शिशिर शिंदेंची दांडी 

दरम्यान, या मेळाव्याला मनसे नेते शिशिर शिंदे यांनी दांडी मारली होती. काही महिन्यांपूर्वीच त्यांनी आपल्याला नेतेपदाच्या जबाबदारीतून मुक्त करावे, अशी विनंती करणारे पत्र पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांना लिहिले होते. मात्र, आपण मनसेला ‘जय महाराष्ट्र’ करणार असल्याचे शिशिर शिंदे यांनी या पत्रात कुठेही लिहिलेले नसले, तरी शिंदे सध्या मनसेच्या कार्यक्रमाला जाणे टाळत असल्याचे वारंवार दिसत आहे.



हेही वाचा

राज ठाकरेंकडून मनसेच्या बहुतांश अंगिकृत संघटना बरखास्त


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा