... तर परिणामांना तयार राहा

  Pali Hill
  ... तर परिणामांना तयार राहा
  मुंबई  -  

  मुंबई - मराठा क्रांती मूक मोर्चांनी सध्या राज्यात वातावरण तापले आहे. दरम्यान, काॅंग्रेस नेते नारायण राणे यांनी सोमवारी मराठा समाजाच्या प्रश्नांवरून सरकारवर चौफेर हल्ला चढवला. "राज्यात मराठ्यांचे लाखोंच्या संख्येने मोर्चे निघत आहेत. पण मराठ्यांच्या महत्वाच्या मागण्यांकडे लक्ष देण्याबाबत सरकार उदासीन आहे. मराठा आरक्षणाला सत्ताधारी शिवसेना-भाजप सरकारचा मनापासून पाठिंबा नाही. मराठा समाजाची भावना सरकारने समजून घ्यावी. तसेच आरक्षण न दिल्यास होणाऱ्या परिणामांसाठी सरकारने तयार राहावे", असा इशारा राणे यांनी दिला आहे.

  काँग्रेस प्रदेश मुख्यालयात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. राणेंनी सत्ताधारी भाजपा आणि शिवसेनेचा खरपूस समाचार घेतला. "भाजप -शिवसेना राजकीय स्वार्थासाठी मराठा मोर्चाला पाठिंबा असल्याचे सांगत आहे. मात्र आरक्षण देण्याची इच्छा सरकारला नाही. घटनेच्या कलम १५ (अ ) आणि १६(४) नुसार सरकार या आरक्षणाचा विचार करत नाही. सरकारने नियुक्त केलेल्या शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या समितीने याचा अभ्यास करावा", असे राणे म्हणाले.
  यावेळी ठाकरे बंधूंवरही राणेंनी जोरदार 'प्रहार' केला. शिवसेनेने मराठा आरक्षणाला मनापासून पाठिंबा दिला नाही. मराठ्यांच्या विराट मोर्चाकडे बघून शिवसेनेच्या पायाखालची वाळू सरकली आहे. म्हणूनच त्यांनी मराठा आरक्षणाला पाठिंबा दिला आहे. तसेच सामनामधील व्यंगचित्राविरोधात राज्यभर पडसाद उमटल्यामुळे राजकीय स्वार्थापोटी शिवसेना पक्षप्रमुखांनी माफी मागितली, असा घणाघात राणेंनी केला. आर्थिक निकषावर आरक्षण देण्याची मागणी करणारे राज ठाकरेही राणेंच्या टीकेतून सुटले नाहीत. "मनसे हा पक्ष उगवला कधी आणि मावळला कधी हे कोणालाच कळले नाही", या शब्दांत राणे यांनी राज ठाकरे यांची खिल्ली उडवली.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.