नारायण राणेंचे शिवसेना, भाजपावर तोंडसुख

 Kanjurmarg
नारायण राणेंचे शिवसेना, भाजपावर तोंडसुख
Kanjurmarg, Mumbai  -  

कांजूर मार्ग - मुंबई महानगरपालिका हा राजकारणाचा अड्डा आहे का? असा खरपूस सवाल माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांनी शिवसेना, भाजपाला केला आहे. बुधवारी कांजूर मार्ग येथे झालेल्या काँग्रेसच्या प्रचार सभेत ते बोलत होते. या वेळी नारायण राणे यांनी शिवसेना आणि भाजपावर सडकून टीका केली. शिवसेना, भाजपा यांनी मुंबईवर 25 वर्ष एकत्र सत्ता उपभोगली आणि आता ते एकमेकांची औकात काढत आहेत. तसंच मोदींनी सांगितलेले अच्छे दिन कुठे आहेत? तीन वर्षांत आले का अच्छे दिन? असा सवालही राणे यांनी भाजपाला विचारला.

86% चलन एका रात्रीत बंद करून मोदींनी देशाचं प्रचंड मोठं आर्थिक नुकसान केलं. यामुळे बेरोजगारी वाढली, कारखानदारी बुडाली, शेतकऱ्यांचे हाल झाले, असा असतो का कॅशलेस देश? असा सवाल विचारत राणे यांनी मोदी सरकारवर हल्लाबोल केला. भ्रष्टाचाराचे अनेक दाखले देत राणे यांनी मुंबई महानगरपालिकेची ओळख ही भ्रष्टाचारी असल्याचं सांगितलं.

मुंबईमधील अशुद्ध पाणी पुरवठा, वाहतूक व्यवस्था असे अनेक प्रश्न असून मुंबई शहर बकाल केलंय असं म्हणत राणे यांनी महानगरपालिकेवर निशाणा साधला. 1960 साली मुंबईत 52 % मराठी माणसाची संख्या होती, ती आता 22% वर आली आहे. हे शिवसेनेचेच अपयश असल्याचं राणे यांनी स्पष्ट केलं. 1993 च्या दंगलीत शिवसेनेने मुंबई वाचवली, पण तेव्हा उद्धव ठाकरे होते का? असा सवाल राणे यांनी विचारात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली.

नळावरच्या बायका ज्या प्रमाणे भांडतात त्या प्रमाणे शिवसेना, भाजपा भांडत असल्याचं सांगत नारायण राणे यांनी शिवसेना, भाजपावर तोंडसुख घेतलं. शिवसेना प्रायव्हेट डॉट कॉम ही पैसे खाणारी कंपनी आहे, असा घणाघातही राणे यांनी शिवसेनेवर केला आणि या निवडणुकीत परिवर्तन करून आणण्याची मागणी नारायण राणे यांनी जनतेकडे केली.

Loading Comments